२४४ विहिरींचे बांधकाम प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2017 01:40 AM2017-05-22T01:40:25+5:302017-05-22T01:40:25+5:30
शेतीला जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ११ हजार सिंचन विहिरी हा
मागेल त्याला विहीर : ३०० लाभार्थ्यांची निवड, ९२ विहिरींचे खोदकाम पूर्ण, १२८ विहिरींना पुरेसे पाणी
अमरचंद ठवरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : शेतीला जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ११ हजार सिंचन विहिरी हा धडक कार्यक्रम आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहे. मागेल त्याला सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्याला ३०० सिंचन विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील २४४ विहिरींचे बांधकाम प्रगतीपथावर असून २२ विहिरींचे बांधकाम होवून १५० फूट बोअरसुद्धा मारण्यात आले.
तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या खरिपाच्या हंगामात भात शेतीच्या सिंचनासाठी विहिरींचा उपयोग करण्याची संधी मिळणार आहे. सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत शेतामध्ये विहिरींच्या माध्यमातून मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध झाल्याने लाभार्थी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
वारंवारची नापिकी, कर्जबाजारी व आत्महत्याचे प्रकार वाढल्याने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ११ हजार सिंचन विहिरी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नामुळे गोंदिया जिल्ह्याला सुद्धा मागेल त्याला सिंचन विहीर या धडक कार्यक्रमाचा लाभ मिळाला.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उपविभागीय अधिकारी लघू सिंचन जि.प. उपविभाग कार्यालयाच्या वतीने आॅनलाईन पद्धतीने तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. गरजू लाभार्थी शेतकऱ्यांकडून सिंचन विहिरीसाठी चांगलाच प्रतिसाद मिळाला. सदर सिंचन विहिरींसाठी शासनाकडून निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यास २ लाख ५० हजारांचे अनुदान त्यांच्या बँकेत बचत खात्यावर टप्या टप्याने वळते केले जाते. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. विहिरीमध्ये जलसाठा मुबलक रहावा म्हणून १५० फुटांचे बोअर विहिरीमध्ये मारणे आवश्यक केले आहे.
तालुक्यातील निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी करारनामा करुन २४४ विहिरींच्या बांधकामाला सुरुवात झाल्याचे उपविभागीय अधिकारी (लपाजिप) घरतकर यांनी सांगितले. खोदकाम सुरू करण्यात आलेल्या १२८ विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी लागल्याचे सांगण्यात आले. सध्या ९२ विहिरींचे खोदकाम जवळपास पूर्ण झाले आहे.
आजघडीला २२ विहिरी बोअरसह पूर्ण बांधकाम झाले. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी पहिल्या प्रथम उसणेउधारी करून विहिरीचे बांधकाम शेवटच्या टप्यापर्यंत नेले आहे.
३ कोटी ३ लाख १४ हजारांचे देयके मंजूर करुन लघु पाटबंधारे विभागाने पंचायत समितीकडे पाठविले. उर्वरित अनुदानाची वरिष्ठांकडे मागणी केल्याचे समजते. निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप बांधकामाच्या टप्प्यानुसार त्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर सरळ जमा करणे असा निकष असतानासुद्धा पंचायत समितीने काही शेतकऱ्यांना धनादेश देण्याची प्रथा अवलंबविल्याचे बोलल्या जाते.
कित्येकांना धनादेशासाठी वारंवार पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याचे चित्र पहायला मिळते. परस्पर खात्यावर वळते करण्यास अडचण कोणती, हेच कळायला मार्ग नाही.
अनेक गावे जलसिंचनापासून वंचित
४तालुक्यात इटियाडोह जलाशय, नवेगावबांध यासारखे मोठे जलाशय असले तरी तालुक्यातील कित्येक गावे जलसिंचनाच्या सोयीपासून आजही वंचित आहेत. एक दोन पाण्याच्या अभावाने हाती आलेल्या पिकापासून शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे. तालुक्यात मोठे धरण असतानाही हजारो शेतकरी पाण्यापासून मुकले जावून ‘सुजलाम सुफलाम’चे स्वप्न हवेतच विरत असल्याचे चित्र तालुक्यातील बहुतेक ठिकाणी दिसत आहे.
३.३७ कोटींचे अनुदान प्राप्त
४११ हजार सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुक्याचा समावेश झाल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळून जलसिंचनाची सोय उपलब्ध करण्याची संधी मिळाली. संपूर्ण तालुक्यात ३०० शेतकरी लाभार्थ्यांची सिंचन विहिरीसाठी निवड करण्यात आली. विहिरींच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या निधीपैकी ३ कोटी ३७ लाख ५० हजार रूपयांचे अनुदान पंचायत समितीला प्राप्त झाले आहे.