घरकुलांचे बांधकाम केवळ कागदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 09:57 PM2017-12-21T21:57:01+5:302017-12-21T21:57:25+5:30
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत लाभार्भ्यांना घरकूल मंजूर करुन त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. मात्र यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांनी निधीची उचल करुन घरकुलांचे बांधकाम केले नसल्याची धक्कादायक बाब पंचायत समितीने केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत लाभार्भ्यांना घरकूल मंजूर करुन त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. मात्र यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांनी निधीची उचल करुन घरकुलांचे बांधकाम केले नसल्याची धक्कादायक बाब पंचायत समितीने केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आली आहे.
गोरगरीब लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यानंतर घरकुल बांधकामाकरिता दोन टप्प्यात रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. मात्र गोंदिया पंचायत समितीने ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करुन त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. त्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले त्यांचे सर्वेक्षण पंचायत समितीने नुकतेच केले असता धक्कादायक बाब उघडकीस आली. अनेक लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाची दोन टप्प्यातील रक्कम उचलूनही बांधकाम केले नसल्याचे आढळले. त्यामुळे पंचायत समितीने या लाभार्थ्यांना नोटीस बजावून घरकुल बांधकामाकरिता बँक खात्यात जमा केलेली रक्कम व्याजासह परत करण्यास सांगितले आहे.लाभार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लाभार्थ्यांच्या हातात नोटीस पडताच काहींनी बांधकाम सुरू केल्याची माहिती आहे. तर काही लाभार्थ्यांनी दोन हप्त्याची रक्कम उचलूनही अर्धवट बांधकाम केल्याचे सर्वेक्षण दरम्यान उघडकीस आले. शासनाने गोरगरीब लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी अनुदान दिले. मात्र त्याचा योग्य उपयोग होत नसल्याने प्रशासन यासंदर्भात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोंदिया तालुक्यात ३५० वर लाभार्थी
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल बांधकामासाठी निधीची उचल करुनही बांधकाम न करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ३५० च्यावर आहे. या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी ३० ते ३५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. मात्र त्यांनी बांधकाम न केल्याने त्यांना पंचायत समितीने नोटीस बजाविल्याची माहिती आहे.
मोठा घोटाळा पुढे येण्याची शक्यता
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यातील ३० ते ४० हजार घरकुल मंजूर करण्यात आले. त्यासाठी पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. पण बऱ्याच लाभार्थ्यांनी निधीची उचल करुन काहीच बांधकाम केले नसल्याची बाब गोंदिया तालुक्यात उघडकीस आली. त्यामुळे असेच सर्वेक्षण जिल्हाभरात केल्यास मोठा घोळ समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निधीची उचल करुनही घरकुलाचे बांधकाम न करणाऱ्या जवळपास ३५० लाभार्थ्यांना आत्तापर्यंत नोटीस बजाविण्यात आली आहे. घरकुल बांधकामासाठी दिलेल्या निधीचा योग्य उपयोग व्हावा हाच शासनाचा उद्देश आहे.
- डॉ.एस.के.पानझाडे,
खंडविकास अधिकारी गोंदिया.