कोरोना आपत्तीतही बांधकाम सुरू पण उपाययोजनांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:28 AM2021-05-23T04:28:16+5:302021-05-23T04:28:16+5:30
आमगाव : कोरोनाविरोधात राज्यासह जिल्हाही लढा देत आहे. सध्या कोरोना संसर्ग काळ सुरू असून, बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...
आमगाव : कोरोनाविरोधात राज्यासह जिल्हाही लढा देत आहे. सध्या कोरोना संसर्ग काळ सुरू असून, बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढविण्यात आले आहे. तर संचारबंदी लादलेली असून सकाळी ११ वाजतापर्यंत अतिआवश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. परंतु नगरात अनेक ठिकाणी बांधकामे तेजीत सुरू आहेत. या बांधकामस्थळी शासनाने निर्धारित केलेले नियमही पाळले जात नाहीत. याकडे प्रशासनाचा मात्र कानाडोळा होत आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केले. संचारबंदीची अंमलबजावणी करताना अनेक निर्बंध लादण्यात आले. अतिआवश्यक सेवांना फक्त सकाळी ११ वाजतापर्यंत सवलत देण्यात आली. नागरिकांनी खबरदारी घेऊन घरीच राहावे, असे आवाहन वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी केले. जिल्हा प्रशासनही नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आहे. परंतु नगरात बांधकामे मोठ्या जोमाने सुरू आहेत. या बांधकामस्थळी मजुरांसाठी सुरक्षाविषयक कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्याचेही दिसून येत नाही. कोरोनाविषयक नियम न पाळताच बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी विनापरवानगी कामे सुरू आहेत. तसेच बहुतेक कामे कुठलीही काळजी न घेता व कोरोनाचे कुठलेच नियम न पाळता सर्रास सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी नगर परिषद प्रशासनाने लक्ष केंद्रित करून बांधकामस्थळी अधिकाऱ्यांनी भेट देऊन नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना याची पाहणी व कारवाई करावी, अशी मागणी नगरातील सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.