पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे सदोष बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 09:22 PM2019-06-12T21:22:41+5:302019-06-12T21:23:15+5:30
स्थानिक पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तालुक्यातील पालांदूर (जमी.) येथे पूरक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १ कोटी ४ लाख ३० हजार १७५ रुपये खर्चाची नळ योजना सन १६-१७ मध्ये मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अंदाजपत्रकाने प्रमाणे १९ लाख रुपये खर्चून चुंभली नदीच्या तिरावर विहिरीचे बांधकाम करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : स्थानिक पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तालुक्यातील पालांदूर (जमी.) येथे पूरक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १ कोटी ४ लाख ३० हजार १७५ रुपये खर्चाची नळ योजना सन १६-१७ मध्ये मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अंदाजपत्रकाने प्रमाणे १९ लाख रुपये खर्चून चुंभली नदीच्या तिरावर विहिरीचे बांधकाम करण्यात आले. परंतु सदर विहिरीचे बांधकाम तांत्रीकदृष्ट्या योग्य नसल्याने ती एका बाजूला झुकल्याने नदीच्या प्रवाहाने पूर्णत: कोलमडण्याची शक्यता आहे. या प्रकाराला पूर्णपणे कंत्राटदार व संबंधित अभियंता दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतने केली आहे.
तालुक्यातील पालांदूर (जमी.) येथे तयार होणाऱ्या पूरक नळयोजनेचे पाणी नागरिकांना मिळणार होते. परंतु ज्या विहीरीतून पाण्याचा उपसा करुन पुरवठा करावयचा होता. ती विहीरच सदोष असल्याने १ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अभियंत्याने २० फुट व्यासाठी विहिरीचे बांधकाम करताना वरच्या भागाला १९.६ व्यासाची रिंग तयार केली.
परिणामी विहिरीचे बांधकाम एका बाजुला झुकले असून ती कोसळण्याची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही. गावकऱ्यांनी ही बाब सदर कंत्राटदार आणि अभियंत्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी विहिरीला दोरीने बांधून जेसीबी, पोकलॅड सारख्या यंत्राने सरळ करुन देण्याच्या आश्वासन दिल्याने गावकरी सुध्दा विचारात पडले आहे. पैसे वाचविण्यासाठी कंत्राटदारांनी विहिरीचा व्यास वरील भागाला कमी घेतल्याचे बोलल्या जाते.
विहिरीचे सदोष बांधकाम करणाºया कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे व अभियंत्यावर निलबंनाची कारवाही करून विहीर बांधकाचा खर्च वसूल करण्याची मागणी पालांदूर (जमी.) येथील नागरिकांची एकमुखी मागणी आहे.