मृत व्यक्तीच्या नावावर घरकुल बांधकाम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:40 AM2021-02-27T04:40:03+5:302021-02-27T04:40:03+5:30
अर्जुनी मोरगाव : ज्या व्यक्तीच्या नावावर स्वतःच्या मालकीची जागा नाही, घरकुल मंजुरीची मागणी केली नाही, अशा चार वर्षांपूर्वी मृत ...
अर्जुनी मोरगाव : ज्या व्यक्तीच्या नावावर स्वतःच्या मालकीची जागा नाही, घरकुल मंजुरीची मागणी केली नाही, अशा चार वर्षांपूर्वी मृत पावलेल्या व्यक्तीच्या नावावर घरकुल मंजूर झाले. बांधकामही सुरू झाले. झालेल्या बांधकामाचे पैसे मात्र दुसऱ्याच व्यक्तीच्या बँक खात्यात जमा झाल्याचा प्रकार तालुक्यातील खामखुरा येथे उघडकीस आला आहे.
खामखुरा येथील महादेव घिगू नेवारे या इसमाचा २० फेब्रुवारी २०१७ रोजी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तो गावानजीकच्या कालव्याच्या कडेला झोपडी बांधून राहायचा. त्याच्या नावे स्वतःच्या मालकीची ग्रामपंचायत नमुना आठमध्ये नोंद असलेली जमीन नाही, तरीसुद्धा तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घरकुलासाठी त्याच्या नावाची शिफारस केली.
२०१५-१६ मध्ये त्याला पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले. त्याला वारस नाहीत. त्याच्या नावावर असलेल्या घरकुलाचे बांधकाम* दुसरीच व्यक्ती करीत आहे. रोजगार सेवकाने या दुसऱ्या व्यक्तीचे बँक खाते क्रमांक दिल्यामुळे या खात्यावर ३० सप्टेंबर २०२० रोजी वीस हजार व ३ फेब्रुवारी रोजी ४५ हजार असे एकूण ६५ हजार रुपये देना बँक शाखा अर्जुनी मोरगावच्या बँक खाते क्र ०५०११००३३८१९ मध्ये जमा करण्यात आले आहेत.
.....
यादी जुनीच - अजय अंबादे
या लाभार्थ्याला २०१५-१६ मध्ये घरकुल मंजूर झाले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याचे कुणीही वारस नसल्याने घरकुलचा प्रस्तावच तयार झाला नाही. त्याचे नावे घरकुल बांधकाम सुरू असल्याचे आपणांस माहीत नाही. नव्याने आलेल्या यादीत मृताचे नाव नाही. त्याला जागाच नाही, त्यामुळे ग्रामपंचायत दप्तरी नमुना आठ उपलब्ध नसल्याची माहिती सरपंच अजय अंबादे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
.....
चुकीची माहिती दिली
घरकुल बांधकामाविषयी रोजगार सेवकाने चुकीची माहिती दिली. एका महिलेचे बँक खाते क्रमांक दिले. त्यामुळे तिच्या खात्यात पैसे गेले. एकच वीस हजाराचा हप्ता बँकेला गेला. दुसरा हप्ता नुकताच गेला असून, तो परत मागवू. ते बँक खाते ब्लॉक करण्याविषयी बँकेला कळविण्यात येईल. देण्यात आलेल्या हप्त्याची राशी वसूल केली जाईल, अशी माहिती अभियंता चिंधालोरे यांनी दिली.