बांधकाम साहित्याअभावी अनेक घरकुलांचे बांधकामे अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:21 AM2021-04-29T04:21:33+5:302021-04-29T04:21:33+5:30
नवेगावबांध : शासनाच्या घरकूल योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर झाले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे घरकूल बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने बंद ...
नवेगावबांध : शासनाच्या घरकूल योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर झाले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे घरकूल बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने बंद असल्याने बांधकाम ठप्प पडले आहेत. काहींची बांधकामे अर्धवट आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी घरकुलाचे बांधकाम कसे पूर्ण होणार अशी चिंता लाभार्थ्यांना सतावित आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत ज्यांना रहायला छत नाही, अशा सर्व लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून घरकूल मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे कित्येक लाभार्थ्यांनी आपले राहते जीर्ण व कच्चे घर पडले आहे. सध्या पाडलेल्या घराशेजारी पाल बांधून दिवसामागून दिवस काढत आहेत. घरकूल बांधकामाला लागणारे सिमेंट, लोहा, गिट्टी, तार, खिळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी साहित्य हे हार्डवेअर दुकानात मिळत असतात. परंतु राज्य शासनाने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनमुळे बांधकामे सुरू राहतील असे सरकारने सांगितले होते.मात्र बांधकामाला लागणाऱ्या साहित्यांची दुकाने बंद असल्यामुळे घरकूल बांधकाम ठप्प पडले आहे. काहींचे घरकूल बांधकाम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची राहण्याची अडचण लक्षात घेता शासनाने बांधकाम साहित्याची दुकाने सुरू करावी, अशी मागणी अर्जुनी-मोरगाव समितीचे माजी सदस्य रामलाल मुंगणकर यांनी केली आहे.
बॉक्स
पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची भीती
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे आच्छादन टाकून अनेकांनी राहण्याची तात्पुरती सोय केली आहे. परंतु आगामी महिनाभरात पावसाळा लागणार आहे. त्या दिवसात वादळ, वारा, अन् पावसाचा सामना कसा करावा, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण होणे गरजेचे आहे. असा सूर लाभार्थ्यांकडून उमटत आहे.