गरज नसताना डांबरी रस्त्यावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 06:01 PM2024-04-27T18:01:35+5:302024-04-27T18:04:42+5:30

शासकीय निधीची उधळपट्टी : चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

Construction of cement road starts on tarmac road when there is no need | गरज नसताना डांबरी रस्त्यावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु

Construction of road when there is no need

लोकमत न्यूज नेटवर्क
कोहमारा :
दोन वर्षांपूर्वी तयार केलेल्या पक्क्या डांबरी रस्त्यावर गरज नसताना सिमेंट रस्त्याचे बांधकाम करून शासकीय निधीची उधळपट्टी केली जात असल्याचा प्रकार सध्या सडक अर्जुनी तालुक्यात सुरू आहे. शासकीय निधीची उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग सडक अर्जुनी अंतर्गत बानटोला ते कोहळीटोला, कोल्हारगाव ते कोसंबी कनेरी ते गोंडउमरी या गावांतर्गत रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. हे रस्ते चांगले असतानाही चालू आर्थिक वर्षात या रस्त्यावर सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहे.

डांबरीकरणाचे पक्के रस्ते सुस्थितीत असताना सिमेंट रस्त्यांची गरज का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. ही एकप्रकारे शासकीय निधीची उधळपट्टीच असून, निधीची उधळपट्टी करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची दखल घेतात याकडे आता या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकप्रतिनिधींकडून कामाची शिफारस
लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाचा विकास निधी खर्च करीत असतात. स्थानिक विकास निधीबरोबरच शासनाच्या ३०५४//२५१५ या लेखाशीर्षांतर्गत खर्च करावयाच्या निधीसाठी कार्यकर्त्या- कडून कामाची यादी मागवितात. यात सर्वात जास्त रस्ते व नाली बांधकामाची कामे असतात. बरेच कार्यकर्ते हे कंत्राटदार असल्याने अन्य योजनांतून झालेल्या रस्त्याची कामे जास्त मागतात. त्याच कामाला निधी मंजूर होतो. मात्र बांधकाम विभागाकडून सुचविलेल्या कामावर नव्याने बांधकाम करण्याची गरज आहे किंवा नाही याची शहानिशा न करता सरसकट अंदाजपत्रक तयार करून बांधकाम करण्याचा सध्या सपाट सुरु असल्याचे चित्र आहे.

एकाच रस्त्याचे वांरवार बांधकाम
सर्वसामान्य नागरिकाकडून चांगल्या दर्जाचे मजबूत डांबरी रस्त्यावर नव्याने बांधकाम का करतात अशी विचारणा केली असता शासनाकडून रस्ता मंजूर करण्यात आला आहे. आलेला निधी परत जाता कामा नये असे सांगून बांधकाम केले जात असल्याचे उत्तर दिले जाते. ही एकप्रकारे शासकीय निधीची उधळपट्टी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

कनेरी ते गोंडउमरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
सार्वजनिक बांधकाम विभाग सडक अर्जुनी अंतर्गत कनेरी ते गोंडउमरी
रस्त्यावर सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिक ग्रामपंचायत पदाधि- काऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. मात्र बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. हा रस्ता दोन महिन्यांतच उखडायला लागला आहे.

रस्ता बांधकामात रोपट्यांची कत्तल
सामाजिक वनीकरण विभागा- कडून राज्यमार्ग तसेच गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली आहे. या विभागाकडून सलग तीन वर्षे रोपट्यांची देखभाल व जोपासना केली जाते. रस्ता बांधकामासाठी लागणारे साहित्य या रोपट्यांवर पडत असल्याने अनेक रोपटे नष्ट झाली आहेत. रस्ते बांधकामात रोपट्यांचा बळी जात असल्याचे चित्र आहे.
 

Web Title: Construction of cement road starts on tarmac road when there is no need

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.