२२ कोटींच्या रस्त्यांची बांधकाम निधीअभावी अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:33 AM2021-08-20T04:33:18+5:302021-08-20T04:33:18+5:30
विजय मानकर सालेकसा : तालुक्यात रस्ते व पुलाच्या बांधकामसाठी चालू अर्थसंकल्पीय वर्षात २१ कोटी ९० लाख ३६ हजार रुपयांची ...
विजय मानकर
सालेकसा : तालुक्यात रस्ते व पुलाच्या बांधकामसाठी चालू अर्थसंकल्पीय वर्षात २१ कोटी ९० लाख ३६ हजार रुपयांची कामे मार्च २०२१ मध्ये मंजूर करून निविदा स्तरावर टाकण्यात आली आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने आतापर्यंत या बांधकामांसाठी कवडीचाही निधी दिला नाही. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र चांगल्या रस्त्यांअभावी हाहाकार माजला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून तालुक्यातील रस्ते अपघातांचे द्वार झाल्याचे चित्र आहे.
सालेकसा तालुक्यात सार्वजनिक बांधकाम उपविभागअंतर्गत एकूण आठ कामे प्रस्तावित असून यात दोन कोटी ३० लाख रुपये निधीचे २५७ ते २६० कि.मी. सालेकसा-आमगाव-गोंदिया-तिरोडा व पुढे रामटेक-सावनेर-काटोलपर्यंत जाणारा स्टेट बार्डर रोड अंतर्गत रस्ता बांधकाम मंजूर असून या रस्त्यासाठी निधी आणि निविदा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यात ९० लाख रुपये किमतीचे आमगाव खुर्द, लोहारा, फुक्कीमेटा, पुराडा, सिरपूर मार्गावर पुलांचे पुर्नबांधणीची कामे मंजूर आहेत. आमगाव खुर्द तिरखेडी, फुक्कीमेटा मार्गाचे रुंदीकरणासाठी पाच कोटी रुपयाचे काम प्रस्तावित आहे. राज्य सीमेवरील रस्ते रुंदीकरणासाठी तालुक्यातील कोटजमूरा-लटोरी-नवेगाव-सोनपुरी व जमाकुडो-कोसमतर्रा-मानागड-मरकाखांदा-लभानधारणी रस्ता रुंदीकरण व बांधकामसाठी चार कोटींची कामे प्रस्तावित आहेत. विचारपूर, कोपालगड, पथराटोला, मानागड, गोर्रे, तिरखेडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. पाणी निकासीची व्यवस्था करण्यासाठी आमगाव खुर्द, तिरखेडी, पुराडा मार्गावर ८४ लाख ३६ हजार रुपयाची कामे मंजूर आहेत. याशिवाय वाघनदीवर बोदलबोडी-भजेपारदरम्यान नवीन मोठ्या पुलांसाठी सहा कोटींचे काम प्रस्तावित आहे; परंतु वरील सर्व कामे आजघडीला रखडलेली आहेत.
...........
या मार्गावरील खड्डे बनले मृत्यूचे दार
तालुक्यातूृन जाणारा आमगाव, सालेकसा, दरेकसा, डोंगरगड राज्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहे. मुख्यालयाच्या ठिकाणी बहेकार काॅम्प्लेक्सजवळ जीवघेणे खड्डे पडले आहेत. गोवारीटोला ते खेडेपार, लटोरी-कोटजमूरा, पोवारीटोला बनवेगाव, पानगाव-कहाली, लटोरी-नवेगाव, लटोरी-बाम्हणी ही सर्व रस्ते चिखल व खड्डेमय झाले आहेत. रस्त्यांवर फक्त पाण्याचे डबके दिसून येत आहेत.
.....
‘प्रस्तावित कामे निविदा स्तरावर असून कोविड संकटामुळे निधी मिळाली नाही. परंतु लवकरच कामे सुरू केली जातील, यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.
राकेश तुरकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम सालेकसा.