रेल्वे स्थानकावर शौचालय बांधकाम करा
By admin | Published: June 20, 2017 12:56 AM2017-06-20T00:56:35+5:302017-06-20T00:56:35+5:30
दरमहा कोट्यवधी रूपये रेल्वेला देत असलेल्या प्रवाशांना मात्र रेल्वे स्नाथकावरील प्रवासी सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे.
ड्रामाने केली मागणी : स्थानकावर प्रवासी सुविधांचा अभाव
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दरमहा कोट्यवधी रूपये रेल्वेला देत असलेल्या प्रवाशांना मात्र रेल्वे स्नाथकावरील प्रवासी सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे. स्थानकावर शौचालयांची (मुत्रीघर) कमतरता असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर शौचालयांचे बांधकाम करून सोबतच प्रवासी सुविधा वाढविण्याची मागणी डेली रेल्वे मुवर्स असोसिएशनने (ड्रामा) केली आहे.
आजघडीला येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ व ४ वर फक्त दोनच शौचालय असून तेही पूर्व व पश्चिम दिशेच्या कोपऱ्यावर. फलाट क्रमांक ५ व ६ वर फक्त एकच शौचालय आहे. याशिवाय आणखी दोन शौचालय असून त्यात प्रवासी जाऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वी नागपूर विभागाचे डिआरएम अग्रवाल व वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सिब्बल यांच्याकडे खासदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा विषय ड्रामाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी मांडला. यावर त्यांनी नवे शौचालय बांधकाम करावयाचे नसल्याचे उत्तर दिले.
माहितीनुसार, भारतीय रेल्वे अधिनियमांतर्गत येथील रेल्वे स्थानकावर किमान १५ तिकीट खिडक्या, प्रत्येक फलाटावर पीण्याच्या पाण्याचे १२ नळ, प्रत्येक फलाटावर १०० स्क्वेयर मीटरचे प्रतिक्षालय, प्रत्येक फलाटावर १० शौचालय व १०० खुर्च्या असव्यात. येथे मात्र प्रशासनाकडून फक्त पैसा वसूल केला जात असून प्रवाशांना सुविधांपासून वंचीत ठेवले जात आहे. छत्तीसगड मधील गेवरारोड, कोरबा, रायगड, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, डोंगरगड या रेल्वे स्थानकांचा भरपूर विकास झाला आहे. येथून सुमारे १०० गाड्या दररोज सुटत आहेत. तर दुसरीकडे मात्र विदर्भ तहानलेलाच सोडण्यात आला आहे. रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधा वाढविण्यात याव्या अशी मागणी ड्रामाचे सचिव अशोक शर्मा, कोषाध्यक्ष जितेंद्र परमार, रेल्वे कमिटी सदस्य मेहबूब हिरानी, प्रकाश तिडके, विष्णू शर्मा, राजेश बंसोड आदिंनी केली आहे.