धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 09:40 PM2018-11-05T21:40:04+5:302018-11-05T21:40:29+5:30
धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सोमवारी (दि.५) सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी शहरातील सराफा दुकानात मोठी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सोमवारी (दि.५) सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी शहरातील सराफा दुकानात मोठी गर्दी केली होती.धनत्रयोदशीच्या दिवशी कोट्यवधी रुपयांच्या सोने आणि चांदीची विक्री झाल्याचे सराफ व्यावसायीक देखील सुखावल्याचे चित्र होते.
शहरातील गोरेलाल चौक व दुर्गा चौकात सराफा लाईन आहे.सोमवारी धनत्रयोदशीला सोने चांदीची मागणी लक्षात घेवून सराफा व्यावसायीकांनी विविध दागिने विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले होते. दिवाळी दरम्यान सोने आणि चांदीच्या वस्तूंना ग्राहकांची मोठी मागणी असते. त्यातच धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे वर्षभर केलेल्या बचतीतून सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक आग्रही असते. सोमवारी दुपारी १२ वाजतापासूनच सराफा लाईनमध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत होतीे. त्यानंतर सायंकाळी पुन्हा ग्राहकांच्या गर्दीत वाढ झाली होती. सराफा व्यावसायीकांनी दिलेल्या माहितीनुसार धनत्रयोदशीला दिवसभरात ५ ते ६ कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली.
बाजारपेठ गर्दीने फुलली
दिवाळी निमित्त विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. मागील दोन दिवसांपासून बाजारपेठेत शुकशुकाट होता.धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहकांनी सोने, कपडे तसेच इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत आले होते. ग्राहकांच्या गर्दीमुळे गोरेलाल चौक परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.