शेंडा परिसरातील ग्राहक कव्हरेजअभावी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:18 AM2021-07-23T04:18:36+5:302021-07-23T04:18:36+5:30
एटीएममध्ये सुविधांचा अभाव अर्जुनी-मोरगाव : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील एटीएममध्ये अनेक ठिकाणी गर्दी असल्याचे चित्र दिसून येत ...
एटीएममध्ये सुविधांचा अभाव
अर्जुनी-मोरगाव : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील एटीएममध्ये अनेक ठिकाणी गर्दी असल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी वॉचमन कार्यरत नसल्याने नागरिकांमध्ये भीती आहे. सॅनिटायझर तसेच निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्याची गरज आहे. शिवाय, एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येत असलेल्या नागरिकांच्या व एटीएमच्या सुरक्षेसाठी वॉचमन सतत ठेवणे गरजेचे झाले आहे. याकडे संबंधित बँकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
गोरेगाव : जागतिकीकरणामुळे विविध प्रकारचे आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. हाच प्रकार अन्य व्यवसायांबाबत दिसून येत असून, ग्रामीण कारागीरसुद्धा अडचणीत आहेत.
लक्ष लागले आता नुकसानभरपाईकडे
केशोरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाने आणि तुडतुडा, करपा, खोडकिडा या कीडरोगांनी खरीप हंगामातील धानपिकाची नासाडी झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अपकृपेने हिरावून घेतला. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले आणि मदत मिळण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आता नुकसानभरपाईकडे लागले आहे.
महिनाभरात डांबरी रस्त्यांवर खड्डे
आमगाव : परिसरात निम्म्याहून अधिक रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत डांबरीकरण करण्यात आले आहेत. बहुतांश डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवर महिनाभरात खड्डे पडले आहेत. या रस्त्यांच्या खड्ड्यांत पॅचेस मारले जात आहेत. दरम्यान अल्प कालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.
उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता
देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहन बाहेर काढणे कठीण होत आहे.
रस्त्यावरील बांधकाम साहित्याने अपघात
गोंदिया : बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकले जाते. रेती, गिट्टी, लोखंड रस्त्यावर पडून राहत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रेतीवरून अनेक वाहने घसरून पडत आहेत.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
देवरी : परिसरातील शेतशिवारात अनेक मोकाट कुत्री असून, ती एकटी महिला किंवा पुरुष पाहून हल्ला करतात. पाळीव जनावरांनाही ती जखमी करीत आहेत.
तंटामुक्त समितीचे तंट्याकडे झाले दुर्लक्ष
तिरोडा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीस रूपात रक्कम दिली. मात्र, रक्कम मिळाल्यानंतर समित्यांचे तंट्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
पानगाव-सोनपुरी-खेडेपार रस्ता खड्ड्यात
सोनपुरी : सालेकसा तालुक्यातील पानगाव-सोनपुरी-खेडेपार रस्ता मध्य प्रदेशला जोडणारा एकमेव रस्ता आहे. यंदाच्या संततधार पावसामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
रेतीमुळे घरकुलाचे स्वप्न अधांतरीच
सालेकसा : पर्यावरणाचे कारण सांगत शासनाने रेतीघाट लिलाव केलेले नाहीत. असे असतानाही याच शासनाने रस्ता तथा इमारत बांधकाम, घरकूल बांधकाम मंजूर केले आहे. रेतीला परवानगीच नाही, तर ही कामे होणार तरी कशी, असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे. अशातच काही रेती तस्कर चांगलाच फायदा घेत आहेत. अव्वाच्या सव्वा दराने रेती विक्री होत असल्याने सर्वसामान्यांना बांधकाम कसे करावे, असा प्रश्न पडला आहे.