वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने ग्राहक त्रस्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:21+5:302021-07-11T04:20:21+5:30
गोरेगाव : विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे तालुक्यातील पंधरा ते वीस गावांचा विद्युतपुरवठा पंधरा दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने ...
गोरेगाव : विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे तालुक्यातील पंधरा ते वीस
गावांचा विद्युतपुरवठा पंधरा दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने वीजग्राहक त्रस्त झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून वेळी-अवेळी विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
विद्युत वितरण कंपनीने पावसाळ्याच्या सुरुवातीला देखभाल-दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने आता थोडासा जरी पाऊस किंवा वारा आला तरी विद्युतपुरवठा खंडित होतो. त्यामुळे ग्राहकांना बरेचदा रात्र अंधारातच काढावी लागते. मोहाडी विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पंधरा दिवसांपासून वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत आहे. यासंदर्भात वीजग्राहकांनी विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, लाइनमन यांना विचारणा केली असता, ते आमगाव येथून वीजपुरवठा खंडित असल्याचे सांगून मोकळे होतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असून रात्री-बेरात्री केव्हाही विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने वीजग्राहकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्युत वितरण कंपनीच्या बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करून विद्युतपुरवठा सुरळीत करण्याची मागणी परिसरातील वीजग्राहकांनी केली आहे.