१२ वीचे केंद्र पूर्ववत सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:28 AM2019-01-24T00:28:27+5:302019-01-24T00:28:45+5:30
येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात असलेले १२ वीच्या परीक्षेचे केंद्र (क्रमांक ७७०) पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी कॉँग्रेस अनुसूचीत जाती विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी कॉँगे्रेसने मंगळवारी (दि.२२) तिरोडाचे तहसीलदार संजय रामटेके यांना निवेदन दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी-डाकराम : येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात असलेले १२ वीच्या परीक्षेचे केंद्र (क्रमांक ७७०) पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी कॉँग्रेस अनुसूचीत जाती विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी कॉँगे्रेसने मंगळवारी (दि.२२) तिरोडाचे तहसीलदार संजय रामटेके यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात, मागील ३- ४ वर्षापासून येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वीच्या परीक्षेचे केंद्र (क्रमांक ७७०) सुरु होते. मात्र राजकीय दबावामुळे ते बंद करण्यात आले आहे. सुकडी-डाकराम हे क्षेत्र नक्षलग्रसत आणि आदिवासी बहूल क्षेत्र असून येथे १५ ते २० किमी. अंतरावरील मंगेझरी, कोडोबर्रा, घोटी, गोविंदपूर, बोलदकसा, कचाटोला, रुस्तमपूर, इंदोरा, निमगाव, आलेझरी, बालापूर या गावातील आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, गरीबांची मुले शाळेत येतात. मुले-मुली सकाळी ७ वाजतापासून निघत असून रात्री ७ वाजता घरी पोहोचतात.
हा परिसर व्याघ्र अभयारण्याला लागून असल्यामुळे नेहमी वाघ, बिबट, अस्वल, रानडुकर यासारखे हिंसक प्राणी रस्त्यावर येत असतात. त्यामुळे आपला जीवन मुठीत घेऊन हे विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. येथील परीक्षा केंद्र बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, शारीेरिक व मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. सदर विद्यार्थ्यांना दुसरे केंद्र दिले तर मोठ्या प्रमाणात त्रास होणार. करिता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दखल घेऊन येथील परीक्षा केंद्र (क्रमांक ७७०) पूर्ववत ठेवावे असे नमूद आहे. तसेच दोन दिवसांत परीक्षा केंद्राचा सकारात्मक निर्णय न घेतल्यास तिरोडा तालुका काँग्रेस अनु. जाती विभागाच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असा इशारा देण्यात आला असून निवेदन मंगळवारी (दि.२२) तहसीलदार रामटेके यांना देण्यात आले आहे.