जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:09 AM2018-08-29T00:09:00+5:302018-08-29T00:10:00+5:30

जिल्ह्यात रविवारी (दि.२६) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सलग मंगळवारी (दि.२८) तिसऱ्या दिवशी सुध्दा कायम होती. एकूण ३३ पैकी ९ महसूल मंडळात मागील चौवीस तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परिणामी अनेक नदी नाले भरुन वाहत आहेत.

The continuous increase of rain in the district | जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

Next
ठळक मुद्देनदी नाले फुगले : चारशे घरांची पडझड, नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात रविवारी (दि.२६) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सलग मंगळवारी (दि.२८) तिसऱ्या दिवशी सुध्दा कायम होती. एकूण ३३ पैकी ९ महसूल मंडळात मागील चौवीस तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परिणामी अनेक नदी नाले भरुन वाहत आहेत. संततधार पावसामुळे चारेशहून अधिक घरे व गोठे कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली होती. पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन सुध्दा विस्कळीत झाले होते.
हवामान विभागाने रविवारी (दि.२६) पुढील दोन तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तो अंदाज खरा ठरला असून रविवारी सायंकाळपासून पावसाला सुरूवात झाली. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून मागील चौवीस तासात जिल्ह्यात ३५८ मि.मी पावसाचीे नोंद झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस तिरोडा तालुक्यात झाला असून गोरेगाव व आमगाव तालुक्यातही दमदार पावसाचीे नोंद झाली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत पाऊस सुरूच होता, त्यामुळे त्याचा नागरिकांच्या दैनदिन कामावर परिणाम झाला होता. पावसामुळे अनेकांना सकाळी घराबाहेर पडणे शक्य झाले नाही. पावसाचा जोर कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुजारीटोला धरणाचे आठ तर कालीसरार धरणाचे ३ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. तिरोडा तालुक्यात पावसामुळे नाल्याला पूर आल्याने चांदोरी खुर्द बाघोली या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. संततधार पावसाचा फटका घरे आणि गोठ्यांना बसला. गोरेगाव तालुक्यात १८१ घरे व ४८ गोठ्यांचे अंशत:, तिरोडा तालुक्यात १४१ घरे व १० गोठ्यांचे अशंत:, आमगाव तालुक्यात २० घरे व ७ गोठ्यांचे अंशत:, सडक अर्जुनी तालुक्यात ९ घरे व ३ गोठ्यांचे अंशत: व देवरी तालुक्यात २ घरांचे अशंत: नुकसान झाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण महसूल विभागातर्फे सुरू असून यात वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदी काठालगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी
मागील चौवीस तासात जिल्ह्यातील कामठा, गोरेगाव, कुऱ्हाडी, परसवाडा, तिरोडा, वडेगाव, मुंडीकोटा, ठाणेगाव आणि ठाणा या महसूल मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
शहरातील शाळांना सुटी
हवामान विभागाने जिल्ह्यात दोन दिवस मुळधार पावसाचा इशारा दिला होता. तर मंगळवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे गोंदिया शहरातील अनेक खासगी शाळांनी सुटी जाहीर केली.
पिकांना संजीवनी
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने धानपिकाला संजीवनी मिळाली आहे. पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुध्दा समाधानकारक वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सालेकसा तालुक्याला फटका
सालेकसा : मागील दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे तालुक्यातील नाले भरुन वाहत आहे. छोट्या नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक विद्यार्थी शाळेत पोहचू शकले नाही. पावसाचा जोर कायम असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली. पावसाचा काही प्रमाणात पिकांना सुध्दा फटका बसला असून घरांची सुध्दा पडझड झाली आहे.

Web Title: The continuous increase of rain in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.