सालेकसा तालुक्यात संततधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:00 AM2020-08-22T05:00:00+5:302020-08-22T05:00:27+5:30
धरणाचे गेट उघडल्याने वाघनदीला पूर आला असून अनेक मार्ग अवरुद्ध झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सालेकसा-साखरीटोला मार्गावर तिरखेडी नजीक पुलावरुन पाणी वाहत असल्याने या तालुक्यातील २ क्षेत्राचा संपर्क तुटला आहे. तर कुआढास नाल्यावर सालेकसा, नानव्हा दरम्यान पुलावर खूप मोठया प्रमाणावर वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलेला दिसून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : गुरुवारपासून संततधार पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदि नाल्यांना पूर आला असून ठिकठिकाणी पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे अनेक मार्ग अवरुद्ध झाले आहेत. याचा थेट परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर होताना दिसून आला.
दीर्घ प्रतिक्षेनंतर मागील १० दिवसांपासून दररोज पावसाची हजेरी लागत आहे. मात्र मागील २ दिवसांपासून पावसाचा जोर खुपच वाढला असून सर्वत्र मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे एकीकडे रोवणीची कामे आटोपण्याच्या वाटेवर असून दुसरीकडे तालुक्यातील छोटे मोठे तलाव तुडुंब भरण्याच्या वाटेवर आले आहेत. दरम्यान तालुक्यातील पूजारीटोला, कालीसरार व बेवारटोला धरणात सुद्धा पुरेपुर जलसाठा जमा झालेला आहे. पुढे आणखी पाऊस मोठया प्रमाणात येण्याची शक्यता पाहून पाटबंधारे विभागाने पुजारीटोला धरणाचे १२ गेट उघडले आहे.
धरणाचे गेट उघडल्याने वाघनदीला पूर आला असून अनेक मार्ग अवरुद्ध झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सालेकसा-साखरीटोला मार्गावर तिरखेडी नजीक पुलावरुन पाणी वाहत असल्याने या तालुक्यातील २ क्षेत्राचा संपर्क तुटला आहे. तर कुआढास नाल्यावर सालेकसा, नानव्हा दरम्यान पुलावर खूप मोठया प्रमाणावर वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलेला दिसून आला. याशिवाय भजेपार-सालेकसा, भजेपार- साखरीटोला, अंजोरा-भजेपार, सावंगी/धानोली मार्ग पूर्णपणे बंद झाले.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही सारखा मुसळधार पाऊस पडत असल्याने लोकांना आपल्या घराबाहेर निघणे सुद्धा कठीण झाले. दरम्यान तहसील कार्यालयाचे अनेक कर्मचारी आणि तलाठी यांनी विविध ठिकाणी भेट देवून पुरग्रस्त क्षेत्रात परिस्थितीचा आढावा घेतला. वाघनदीला पूर वाढत चालल्यामुळे आमगाव-सालेकसाला जोडणाºया राज्य मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावरुन पाणी ओलांडताना दिसून आला. रोंढा नाल्यावर सुद्धा पुलावर पाणी पोहोचलेले दिसून आले. त्यामुळे अनेक लोकांनी आपली आवश्यक कामे रद्द केली. सतत पाऊस पडणे सुरु राहिल्यास सर्व मुख्यमार्ग अवरुद्ध होण्याची दाट शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी घरांचीही पडझड झालेली आहे.
त्या पूरग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा
पुजारीटोला धरणाचे १२ गेट उघडण्यात आल्यामुळे वाघनदीला पूर आला आहे. तसेच धरणानंतर ही अनेक लहान मोठे नाले वाघनदीला जाऊन मिळतात. त्यामुळे वाघनदीला पुराचे प्रमाण आणखी वाढल्याने नदी काठावरील गावांना धोका वाढला आहे. अशात त्या पूरग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा महसूल विभागाकडून देण्यात आला आहे. यात वाघनदीच्या काठावर असलेल्या ढिवरटोला, तिरखेडी, भजियापार, बोदलबोडी, नदीटोला, दरबडा, धानोली, म्हशीटोला, केहरीटोला, झालीया, साकरीटोला या गावांचा समावेश आहे. पूर्वी वाघ नदीच्या तीरावरील गल्लाटोला, लोधीटोला, चिंगुलीटोला, खेडोर, कुंभारटोला, पठाणटोला, नवेगाव, पोवारीटोला आणि कुआढास नाल्यालगत घोनसी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.