समाजहितासाठी योगदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 09:14 PM2018-04-09T21:14:20+5:302018-04-09T21:14:20+5:30
समाजातील सर्व घटकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मंथन व्हावे, हा या सप्ताहामागचा उद्देश आहे. डॉ. आंबेडकर हे ज्ञानी व्यक्तिमत्व होते. त्यांनी असंख्य विषयांवर विस्तृत लिखान केले. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : समाजातील सर्व घटकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मंथन व्हावे, हा या सप्ताहामागचा उद्देश आहे. डॉ. आंबेडकर हे ज्ञानी व्यक्तिमत्व होते. त्यांनी असंख्य विषयांवर विस्तृत लिखान केले. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. डॉ. आंबेडकरांनी समाजाच्या कल्याणासाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचले. त्यांची प्रेरणा घेवून प्रत्येकाने समाजाच्या कल्याणासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून ८ ते १४ एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ८ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात या सप्ताहाचे उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे होते. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर, समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, प्रा.धर्मशील चव्हाण, बार्टीचे सहायक प्रकल्प संचालक (समतादूत) रिदय गोडबोले यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरू मानले. महात्मा फुलेंनी ‘शेतकऱ्यांचे आसूड’ ग्रंथामधून शेतकºयांचे दु:ख मांडले. यातून त्यांनी विचारांना कृतीची जोड दिली. समाजाच्या हिताचा विचार करु न त्यांनी पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर व्यक्तींनी आपल्या विचारांना कृतीची जोड दिल्यामुळे ही माणसे महामानव झालीत. शिक्षण घेवून डॉ.आंबेडकरांनी सर्वप्रथम समाजाच्या कल्याणाचा विचार केला. ‘प्रॉब्लेम आॅफ रूपी’ या ग्रंथातून त्यांनी आर्थिक विचार मांडले. हे विचार अत्यंत महत्वाचे आहेत. कितीही वाईट परिस्थिती आली तरी समाजाच्या हितासाठी मागे राहणार नाही, हे डॉ. आंबेडकरांनी ठरविल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सविता बेदरकर म्हणाल्या, सामाजिक समतेची पायाभरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. ‘जाती तोडो समाज जोडो’ ही संकल्पना त्यांनी मांडली. धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या देशात धर्म कधकधी डोके वर काढत असल्याचे सांगून डॉ. बेदरकर म्हणाल्या, सर्व मानव हे एक झाले पाहिजे असे डॉ. आंबेडकरांना वाटायचे. या सप्ताहामुळे समाजात समता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सन २०१७-१८ या वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार मिळाल्याबद्दल सुर्तीसेन वैद्य, लिखन निर्विकार, चरणदास चंद्रिकापुरे, उमाकांत अवस्थी, होमराज ठाकरे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या वेळी प्रा. धर्मशील चव्हाण यांनी दुसºया सत्रात स्पर्धा परीक्षेबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह व निवासी शाळेचे विद्यार्थी, बार्टीचे समतादूत, समाज कल्याण विभाग, विविध महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले. संचालन शिक्षक प्रदीप ढवळे यांनी केले. आभार समतादूत शारदा कळसकर यांनी मानले.