कॉन्व्हेंट फॅशनमुळे शिक्षण महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 08:43 PM2019-04-25T20:43:26+5:302019-04-25T20:44:02+5:30
सध्या इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये मुले शिकविण्याची फॅशन जोमात सुरु आहे. पालकांच्या दृष्टीने ते एक सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. याचाच फायदा घेऊन काही संस्थांनी आवश्यकता नसेल तेथे देखील कॉन्व्हेंट सुरु केले आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात कॉन्व्हेंट सुरु करण्यात आल्याने आता शिक्षण महागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये मुले शिकविण्याची फॅशन जोमात सुरु आहे. पालकांच्या दृष्टीने ते एक सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. याचाच फायदा घेऊन काही संस्थांनी आवश्यकता नसेल तेथे देखील कॉन्व्हेंट सुरु केले आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात कॉन्व्हेंट सुरु करण्यात आल्याने आता शिक्षण महागले आहे. या कॉन्व्हेंटपैकी किती कॉन्व्हेंटना विशेष मान्यता आहे, याची देखील कल्पना कुणाला नाही. त्यामुळे अनधिकृतपणे सुरु केल्या जाणाऱ्या कॉन्व्हेंटवर कारवाई कोण करणार? असा प्रश्नदेखील सामान्य नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
अडीच ते पाच वर्षे वय असणाºया बालकांना कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश दिला जातो. निटनेटका ड्रेस, टाय, बेल्ट, आयकार्ड, पाठीवर दप्तर, टिफीन, वॉटरबॅग आदी साहित्यांनी सजलेला आपला बालक बघून पालकांनादेखील धन्यता वाटत आहे. बालक कॉन्व्हेंटमध्ये जातो. चांगल्या गोष्टी शिकतो. चांगल्या सवई लागतात. कविता म्हणून दाखवितो. या बाबी जरी सत्य असल्या तरी बालकांच्या मानसिकतेनुसार अध्यापन पद्धतीचा अवलंब केला जातो का? या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वास्तविकपणे या वयातील बालकांच्या मानसशास्त्रानुसार त्यांच्यासाठी अध्ययन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. आनंददायी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून हे करणेदेखील शक्य आहे. परंतु गुणात्मक प्रगतीवर संख्यात्मक प्रगती वरचढ झाल्यामुळे शिक्षण पद्धतीतील आनंद पार विरुन गेला आहे. त्याची जागा धोकमपट्टीने घेतली. कॉन्व्हेंटमध्ये अध्यापन करणारे किती जण प्रशिक्षित आहेत. त्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती कोणत्या, हे कळायला मात्र मार्ग नाही.
ज्या कोवळ्या वयात बालकांच्या मनाला वळण द्यायचे असते ते काम कुशल कारागिरांकडून होणे अपेक्षित असते. परंतु बºयाच ठिकाणी मात्र तसे होताना दिसत नाही. आपली कोवळी फुले कोमेजून तर जाणार नाही! याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे.
शहर ते गावापर्यंत रस्त्याच्या आजूबाजूला अनेक कॉन्व्हेंटचे फलक लागलेले दिसतात. विविध सुविधांचे त्यामध्ये प्रदर्शनदेखील केलेले असते. प्रत्यक्षात किती कॉन्व्हेंटमध्ये तशा सुविधा उपलब्ध असतात, हे सांगणे मात्र कठीण आहे. असे असतानाही पालक आपल्या चिमुकल्याला फक्त चांगली चमक-धमक बघून त्या कॉन्व्हेंटमध्ये टाकतात. हीच बाब हेरून आता बघावे तेथे कॉन्व्हेंटचा पसारा झाला आहे. यात मात्र पालकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
मोठे ग्रुपही होत आहेत दाखल
शहरात स्थानिक व्यक्तींकडून किंवा लगतच्या पसिरातील व्यक्तींकडून कॉन्व्हेंट, शाळा-महाविद्यालय सुरू जात होते. मात्र पालकांचे शिक्षणाप्रती वाढलेले आकर्षण व मुलांच्या शिक्षणासाठी जमेल तेवढे पैसे खर्च करण्याची कमजोरी बघून आता मोठे ग्रुपही आपले हातपाय पसरत आहेत. जिल्ह्यात सध्या मोठ्य ग्रुपकडून फ्रेंचायसीवर सुरू असलेले कितीतरी कॉन्व्हेंट बघावयास मिळत आहेत. त्यात दरवर्षी आणखी नव्या ग्रुपची भर पडतच आहे.