मानकर गुरूजीचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचवा
By admin | Published: February 5, 2017 12:21 AM2017-02-05T00:21:42+5:302017-02-05T00:21:42+5:30
लोकांना हेवा वाटावा अशी भवभूती शिक्षण संस्थेची दैदिप्यमान वाटचाल आहे. भाजपाला वाढविण्यात
पालकमंत्री बडोले : लक्ष्मणराव मानकर गुरूजी जयंती महोत्सव
आमगाव : लोकांना हेवा वाटावा अशी भवभूती शिक्षण संस्थेची दैदिप्यमान वाटचाल आहे. भाजपाला वाढविण्यात स्व.लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस आलेले आहेत. त्यांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.
शनिवारी येथे (दि. ४) लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती महोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ.गिरीष व्यास (नागपूर) होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर, तर प्रमुख अतिथी म्हणून आ.संजय पुराम व सर्व सत्कारमूर्ती मंचावर विराजमान होते.
सर्वप्रथम आदर्श विद्यालयामध्ये मानकर गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच भवभूती महाविद्यालयातील महर्षी भवभूती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लक्ष्मणराव मानकर कॉलेज आॅफ पॉलिटेक्निकद्वारा निर्मित प्रोजेक्ट प्रदर्शनीचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी आ.गिरीष व्यास, गोंदियाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक इंगळे, तिरोडाच्या सोनाली देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच माजी आ.हरिष मोरे, डॉ.गजानन डोंगरवार, नटवरलाल गांधी, नाना नाकाडे, भरत क्षत्रिय, चि.तु.पटले यांनी गुरुजींना आयुष्यभर मोलाचे सहकार्य दिल्याप्रित्यर्थ त्यांचाही सत्कार करण्यात आला. भवभूती शिक्षण संस्थेतर्फे डॉ. श्रीराम भुस्कुटे, डॉ.डी.के.संघी, डॉ.दानी, डॉ. कुंभलकर व प्रेरणा हेमने यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेतील विविध घटक संस्थांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.प्रास्ताविक भाषणात संस्थेचे सचिव केशवराव मानकर यांनी सर्व घटक संस्थांची माहिती दिली. ३ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७५ लोकांनी रक्तदान केल्याचे सांगितले. पंतप्रधान कौशल्य विकासाच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण व कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन स्वयंरोजगाराकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष सुरेश असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, स.र.अंजनकर, ढे.र.कटरे, हरिहर मानकर, लक्ष्मीबाई नागपुरे, रमेश कावळे, उर्मिला कावळे, समारंभाचे संयोजक डॉ. श्रीराम, डॉ.डी.के.संघी, जयंत बन्सोड, संदीप हनुवते, ए.ए.सड्डल, राऊत, रंजितकुमार डे, कोटांगले, प्राचार्य रहांगडाले, इ. मंचावर विराजमान होते.
या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.उमेश मेंढे, प्रा.पठ्ठे व प्रा.अर्पना कटरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.श्रीराम भुस्कुटे यांनी केले.