दोषी वनरक्षक व वनमजूर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 05:00 AM2022-04-03T05:00:00+5:302022-04-03T05:00:06+5:30
तालुक्याची घनदाट जंगलासाठी ओळख आहे. त्यात शेंडा, जांभळी-दोडके, कोसमतोंडी, सौंदड, कोहमारा, रेंगेपार-पांढरी, मालीझुंगा व डव्वा परिसरात आजही मौल्यवान सागवान वृक्ष मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. याच परिसरात लाकूड ठेकेदारांच्या माध्यमातून सागवान तस्करी तसेच काही वन कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वनांची कत्तल होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : वनपरिक्षेत्र कार्यालयअंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव-डेपोसह वनक्षेत्रातील सतीटोला गावाजवळील कंपार्टमेंट क्रमांक-६६२ मध्ये गेल्या १५ दिवसांपूर्वी ६ सागवान झाडांची अवैध तस्करी करण्यात आल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणात चौकशीअंती वनरक्षक व वनमजुरास अवैध वृक्षतोडप्रकरणी ३१ मार्च रोजी निलंबित करण्यात आले आहे.
तालुक्याची घनदाट जंगलासाठी ओळख आहे. त्यात शेंडा, जांभळी-दोडके, कोसमतोंडी, सौंदड, कोहमारा, रेंगेपार-पांढरी, मालीझुंगा व डव्वा परिसरात आजही मौल्यवान सागवान वृक्ष मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. याच परिसरात लाकूड ठेकेदारांच्या माध्यमातून सागवान तस्करी तसेच काही वन कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वनांची कत्तल होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. वनखात्याच्या माध्यमातून जंगलांचे रक्षण करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून शासन कोट्यवधी रुपये खर्च करते, पण तालुक्यात वनरक्षकच भक्षक निघाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
त्यातच सतीटोला गावाजवळील जंगलातील कंपार्टमेंट क्रमांक- ६६२ मध्ये ६ सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्या ६ सागवान झाडांच्या थुटांची किंमत ९५ हजार रूपये असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच गोंदियाचे सहायक वनसंरक्षक अधिकारी प्रदीप पाटील (रोहयो, वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनात येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी, वनक्षेत्र अधिकारी गजानन सयाम यांच्या चौकशीत ४ आरोपींसह २ वन कर्मचारी दोषी आढळले आहेत. यामुळे उपवनसंरक्षक कुलराज सिंग यांनी वन कायद्यानुसार कारवाई करून वनरक्षक सोडगीर व वनमजूर लोखंडे यांना ३१ मार्च रोजी निलंबित केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
निलंबन काळात त्या दोघांना नवेगावबांध येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात जोडण्यात आले आहे.
सडक-अर्जुनी तालुक्यात अवैध वृक्षतोडप्रकरणी वन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशा अवैध वृक्षतोडीच्या घटना होऊ नयेत, यासाठी कर्मचाऱ्यांनी सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी क्षेत्र सहायकांनीसुद्धा आपले कर्तव्य पार पाडताना अशा घटना घडू नये, यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.
-सुनील मडावी,
वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक-अर्जुनी