कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:25 AM2021-04-05T04:25:31+5:302021-04-05T04:25:31+5:30
अर्जुनी-मोर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, यापासून आपला जिल्हाही वाचू शकलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस ...
अर्जुनी-मोर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, यापासून आपला जिल्हाही वाचू शकलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी शासन-प्रशासन व पोलीस विभाग करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करून कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी सहकार्य करावे, असे अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार महादेव तोंडले यांनी केले आहे.
तोंडले यांनी, दुकानदारांनी स्वतः व आपल्या दुकानातील कामगार व्यक्तींना मास्क परिधान करण्याकरिता सक्ती करावी, तसेच आपल्या दुकानामध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मास्क नसल्यास प्रवेश नाकारावा, दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, दुकानासमोर सॅनिटायझर ठेवावे, तसेच महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे १ ते ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात रात्री ८ वाजतापासून सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी आहे. या संचारबंदी दरम्यान ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद होणार आहे, तसेच दिवसा सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत मास्क न लावणाऱ्या व्यक्तीवर ५०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. रात्री संचारबंदीच्या दरम्यान दंडाची रक्कम एक हजार रुपये आहे, असे सांगितले, तसेच विनापरवानगी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम घेऊ नयेत, तसेच कार्यक्रमात गर्दी करू नये. १ ते ३० एप्रिलपर्यंत कुठेही आठवडी बाजार भरणार नाही व आठवडी बाजार भरवून विनाकारण गर्दी करू नये. आठवडी बाजार भरविण्यास व गर्दी केल्यास त्यांच्यावर कलम १८८ भारतीय दंडविधान अन्वये गुन्हा नोंद करण्यात येईल. तरी सर्व जनतेने शासनाने दिलेले आदेश व सूचना, तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करून स्वतः, तसेच आपल्या परिवारातील सदस्य, गावातील व परिसरातील जनतेला कोरोना रोगाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे तोंडले यांनी कळविले आहे.