ज्ञानार्जनासाठी हवा दोघांमध्येही समन्वय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 05:00 AM2020-12-06T05:00:00+5:302020-12-06T05:00:17+5:30
विद्यार्थी शाळेत नाही आले तरी शुल्क द्यावेच लागेल असे शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थांवर सक्ती केली जात आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांत शाळा प्रशासनाच्या विरोधात तिव्र असंतोष आहे. कोरोनामुळे यंदा शाळाच सुरू झाल्या नाही. काही खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण देण्याच्या नावावर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला की त्यांच्याकडून फी वसुलीसाठी हा खटाटोप असा सवालही उपस्थित केला जात आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यता असल्याने नोव्हेंबर महिना उलटूनही शाळा संपूर्ण शाळा सुरू झाल्या नाहीत. वर्ग ९ ते १२ हे पाच वर्ग वगळता कोणत्याही शाळा सुरू झाल्या नाही. मात्र खासगी शाळा व्यवस्थापनाकडून शुल्क वसुलीसाठी पालकांना तगादा लावला जात आहे. परंतु खासगी शाळा चालवाव्या कशा , शिक्षकांना वेतन द्यायचे कुठून हा प्रश्न शाळा व्यवस्थापनासमोर निर्माण होत आहे. पालक व शाळा व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधून यावर तोडगा काढण्याची आता गरज आहे.
विद्यार्थी शाळेत नाही आले तरी शुल्क द्यावेच लागेल असे शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थांवर सक्ती केली जात आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांत शाळा प्रशासनाच्या विरोधात तिव्र असंतोष आहे. कोरोनामुळे यंदा शाळाच सुरू झाल्या नाही. काही खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण देण्याच्या नावावर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला की त्यांच्याकडून फी वसुलीसाठी हा खटाटोप असा सवालही उपस्थित केला जात आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षण पध्दती अपयशी ठरली. गोरगरीबांच्या मुलांकडे ॲन्ड्राईड मोबाईल नाही. काहींकडे मोबाईल आहे पण कव्हरेज नाही. यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाला. या ऑनलाईन शिक्षणामुळे एकाच वर्गातील विद्यार्थ्यांत विषमता निर्माण झाली. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण बंद करण्यात आले. याचाच परिपाक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या गृहभेटीचा कार्यक्रम आखला. परंतु खासगी शाळा व्यवस्थापनाकडून ऑनलाईन शिक्षणाचा खटाटोप सुरूच राहिला परीक्षाही ऑनलाईन घेण्यात आल्या. परंतु निकाल विद्यार्थ्यांना देण्यासाठी आता शुल्कची मागणी होत आहे. मात्र आमचे पाल्य शाळेत आलेच नाही त्यामुळे पूर्ण शुल्क न घेता शाळेत अर्धेच शुल्क घ्यावे असा सूर पालकांमध्ये आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्यासाठी शिक्षकांना वेतन दिले त्यामुळे विद्यार्थ्यांनी काही प्रमाणात शुल्क द्यावे असा पवित्रा खासगी शाळा व्यवस्थापनाकडून घेतला जात आहे. यात खासगी शाळांकडून निकाल रोखला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
शुल्क घेतात की सवलत देतात
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता संपूर्ण शुल्क वसुली विद्यार्थ्यांकडून केली जाणार नाही. परंतु एकही शुल्क वसूल न करता विद्यार्थांना मोकळीस दिली जाणार नाही. शुल्क तर भरावेच लागेल परंतु पालकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून शुल्क टप्याटप्याने द्यावे याची सुविधा काही शाळांकडून करून दिली जात आहे. त्यामुळे पालक आणि शाळा संचालकांनी समन्वय साधण्याची गरज आहे.
खासगी शाळांकडून शुल्क वसुली संदर्भात अतिरेक होत असेल तर पालकांनी तक्रार करावी. आमच्याकडे तक्रारी आल्यास चौकशी करून दोषींवर कारवाई करू - राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी
खासगी शाळा स्वखर्चातून चालवितांना मोठी समस्या निर्माण होते. पालकांकडून शुल्क देण्यास टाळाटाळ केली जाते. परंतु शिक्षकांना आम्हाला वेतन द्यावेच लागते. यासाठी पैसा आणणार कुठून ही समस्या आहे. - राजेश गोयल संस्था सचिव
शुल्क दिले तरच परीक्षांचा निकाल
अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली त्यांचा निकालही जाहीर झाला. परंतु अनेक शाळा व्यवस्थापनाकडून शुल्क दिल्या शिवाय विद्यार्थ्यांना निकालच दिला जात नाही. आधी फिस भरा मग रिजल्ट घ्या असा पवित्रा शाळांनी घेतल्यामुळे त्रस्त झालेले विद्यार्थी व पालक शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात दंड पुकारण्याच्या तयारीत आहेत.
कोरानाच्या काळात शिक्षकांना अर्धे वेतन देण्यात आल्याची ओरड आहे. तर विद्यार्थी शाळेतच न गेल्याने पूर्ण शुल्कासाठी आग्रह धरणे चुकीचे आहे. शाळा संचालकांनी सुध्दा पालकांची समस्या समजून घ्यावी.
- मोहन तावाडे, पालक
शाळा व्यवस्थापनाने कोरोनाच्या काळात शाळांवर खर्चच केला नाही. विद्यार्थी शाळेतच गेले नाही तर पूर्ण शुल्क कसे देणार, खासगी शाळांनी काही प्रमाणात शुल्क कमी करण्याची गरज आहे.
- कुसन कोरे, पालक