दोन प्रतिष्ठानांवर येणार कारवाईचे गंडांतर
By Admin | Published: November 28, 2015 02:55 AM2015-11-28T02:55:15+5:302015-11-28T02:55:15+5:30
तपासणीदरम्यान घेण्यात आलेले खाद्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेच्या अहवालात दुषित आढळल्याने शहरातील दोन प्रतिष्ठानांवर आता कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे.
खाद्य पदार्थांचे नमुने दूषित : आतापर्यंत ४१ नमुन्यांची तपासणी
गोंदिया :तपासणीदरम्यान घेण्यात आलेले खाद्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेच्या अहवालात दुषित आढळल्याने शहरातील दोन प्रतिष्ठानांवर आता कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. यात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) न्यायालयात जाणार आहे. यासाठी विभागाकडून कारवाई सुरू असून तसा प्रस्ताव विभागाच्या मुंबई कार्यालयात पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे.
खाद्य पदार्थांत होत असलेल्या भेसळीमुळे मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहेत. आज प्रत्येकच पदार्थात भेसळ होत असून त्यात धान्यच काय तयार खाद्यपदार्थ सुटत नाहीत. या प्रकारामुळे मात्र सकस आहार हिरावून गेले असून आपल्या फायद्यासाठी व्यापारी लोकांना जहर खाऊ घालू लागले आहेत.
भेसळीच्या या प्रकारांवर आळा घालता यावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्याने धान्य व खाद्यपदार्थांची तपासणी केली जाते. या कारवाई दरम्यान विभागाकडून त्या पदार्थांचे नमूने घेतले जातात व त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करून त्याच्या अहवालानुसार कारवाई पुढील कारवाई केली जाते.
जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत विभागाकडून जिल्ह्यात अनेक ठिकाणचे नमुने घेण्यात आले. विविध धान्य व खाद्यपदार्थांचे नमूने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यातील ३० नमूने प्रमाणीत असून ३ नमूने कमी दर्जाचे तर दोन नमूने असुरक्षीत (दुषित) आढळले आहेत. उर्वरीत नमुन्यांचा अहवाल अद्याप आलेला नसल्याची माहिती आहे. प्रमाणीत नमूने म्हणजेच ते खाण्यासाठी योग्य असल्याचे निष्पन्न होते. कमी दर्जाचे म्हटल्यास खाण्यायोग्य म्हणता येणार नाही. अशा या पदार्थांतूनच शरीराला विविध आजारांना पुढे जावे लागते. असुरक्षित म्हणजे खाण्यासाठी योग्य नसल्याचे स्पष्ट होते. (शहर प्रतिनिधी)