कोरोनाने निर्माण केला शेजारधर्म व नातेसंबंधात दुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:28 AM2021-05-24T04:28:19+5:302021-05-24T04:28:19+5:30
केशोरी : मागील मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक संचारबंदी घोषित करून घराबाहेर पडण्यास सक्त मनाई केली. त्यानंतर ...
केशोरी : मागील मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक संचारबंदी घोषित करून घराबाहेर पडण्यास सक्त मनाई केली. त्यानंतर काही प्रमाणात कोरोना नियंत्रणात आल्यानंतर सर्व व्यवहार पूर्वीसारखे सुरू करण्यात आले होते. परत मार्च-एप्रिल २०२१ मध्ये पुन्हा कोरोना विषाणूने डोके वर काढले व शहरापेक्षा ग्रामीण भागातील प्रत्येक गावात कोरोनाचा संसर्ग दिसून आला. त्यामुळे परत राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे शेजारधर्म आणि नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊन सासूरवाशिणीला माहेराला मुकावे लागले आहे. तर विद्यार्थ्यांना मामाच्या गावाला मुकावे लागले. असा अनर्थ कोरोना विषाणूने केल्याचे या वर्षीही अनुभवास आले आहे.
कोरोना विषाणूचा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी तोंडावर मास्क आणि सामाजिक अंतर पाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने कोरोनाने एकाकी जीवन जगावे हे शिकविले आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात शहराशहरांतून संसर्ग वाढलेला दिसून आला होता. मात्र दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील गावागावांत कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले. यामुळे भयावह परिस्थिती पाहावयास मिळाली. या वैश्विक महामारीने गावातील चालते बोलते व्यवहार ठप्प झाले. एवढेच नव्हे तर शेजारी-शेजारी नातेवाईक व मित्र परिवार कोरोनाच्या भीतीने एकमेकांपासून दूर राहू लागले. कोणीही एकमेकांच्या घरी जात नाही. चुकून एखाद्या वेळेस जाण्याचा प्रसंग आलाच तर चक्क आमच्या घरी येऊ नका, असेही शब्द ऐकविण्यात आले आहेत. घराचे दार बंद करून घरातच राहणे, तोंडाला रुमाल बाधून एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्रयत्नातून दुरावा जाणवत आहे. एकमेकांविषयी असलेली आपुलकी कोरोना विषाणूने कमी झाल्याचे दिसून येत आहे. आपल्या जवळील नातेसंबंधातील मंडळीनेसुद्धा एकमेकांच्या घरी जाणे बंद केले. भारतीय संस्कृतीत दैनंदिन जीवनात आदरातिथ्याला अत्यंत महत्त्व दिले असले तरीही कोरोनाकाळात संस्कृती व परंपरा दूर सारल्या गेल्या. कोरोना विषाणूने शेजारधर्म व नातेसंबंधात दुरावा निर्माण केला हे मात्र निश्चित.