कोरोना लसीकरण ठरविणार, शाळा कधी सुरू होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:54+5:302021-05-15T04:27:54+5:30
गोंदिया : मागील वर्षभरापासून कोरोना संसर्ग वाढत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेचे साधे तोंडही पाहता आले नाही. आता तर उन्हाळ्याची ...
गोंदिया : मागील वर्षभरापासून कोरोना संसर्ग वाढत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेचे साधे तोंडही पाहता आले नाही. आता तर उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. त्यातच अजूनही कोरोना संसर्ग कमी झाला नसल्याने आता पुन्हा नववर्षाची शाळा कधी सुरू होणार याचे विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण पास झालो आहोत की नाही याची साधी पुसटशी कल्पनाही नाही.
पहिलीत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर शाळेचे अजून तोंडही पाहिले नाही. विद्यार्थी आता आपल्या पालकांना शाळा कधी सुरू होणार, मला शाळेत जायचे आहे, असे विविध प्रश्न विचारून भांबावून सोडत आहेत. कोरोना संसर्गामुळे राज्य शासनाने गेल्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षणावर भर दिला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरी बसूनच शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यामुळे वर्षभरात अनेक विद्यार्थ्यांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही. त्यांनी शाळेत पाऊलही ठेवले नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण तसेच सतत घरात बसून राहिल्याने विद्यार्थीही आता कंटाळले आहेत. उन्हाळी सुट्ट्या संपल्या की शाळा सुरू होईल असे अनेक विद्यार्थ्यांना वाटत आहे. एका महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाही अनेक पालक शिक्षकांना संपर्क साधून शाळा कधी सुरू होणार, शाळा भरणार का गेल्या वर्षीसारखेच ऑनलाइन शिक्षणच यावर्षीही असणार तर नाही ना असे वाटत आहे. काही विद्यार्थी अजूनही शिक्षकांना ऑनलाइन अभ्यास पाठवा म्हणून शिक्षकांशी संपर्क करीत आहेत.
......
१४,५६५ विद्यार्थी थेट दुसरीत
- मागच्या वर्षी नव्यानेच शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना आपली शाळा कोणती, वर्ग कोणता, वर्गशिक्षक, मुख्याध्यापक कोण, आपले बालमित्र कोण याची साधी ओळखही कोरोनामुळे झाली नव्हती.
- यंदा दुसरी लाट आल्याने यावर्षी तरी शाळेत जायला मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्या वर्गाचे दर्शन न घेतलेल्या १४ हजार बालकांना दुसऱ्या वर्गात जाण्याची संधी मिळाली.
-पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थी किमान काही दिवस तरी शाळेत गेले असल्याने त्यांनी पुढील वर्गाची तयारी चालू केली आहे. जुनी पुस्तके मिळवून अनेकांनी अभ्यास सुरू केला आहे.
- कोरोनामुळे घरात राहून राहून विद्यार्थ्यांना कंटाळा आल्याने आता ते शाळेत कधी जायला मिळणार याच विचारात आहेत. कोरोनाचा संसर्ग कधी संपेल याकडे आशेने बघत आहेत.
..........
यावर्षी शिक्षण ऑनलाइन का ऑफलाइन
कोरोनाची दुसरी लाट राज्यात आल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा याच कामात व्यस्त आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील हे सांगता येत नाही. तरीही १४ जूनला शाळा सुरू झाल्या तरी यावर्षीचे शिक्षण ऑफलाइन असणार का ऑनलाइन असणार असेही अनेक पालकांमधून संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास ऑफलाइन शिक्षणाचा प्रयोग पुन्हा करावा लागेल का यावरही विचारमंथन सुरू आहे.
..................
नवीन शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू होणार आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट अजूनही सुरूच आहे. ही कमी झाल्यानंतरच राज्य शासन शाळांबाबतचा पुढील निर्णय घेणार आहे. अद्याप तरी १३ जूनपर्यंत सुट्टी आहे. शाळा सुरू होणार का नाही याबद्दल निर्णय राज्य सरकार कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच ठरवेल.
- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी, गोंदिया
...............
विद्यार्थी
शाळेतील मजा काही औरच असते. शाळेत जाऊन फार दिवस झाले. अनेक मैत्रिणी फोन करतात. दररोज घरी बसण्याचा, सतत मोबाइलवर ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा आला आहे. दररोज घरी बसून नकोसे वाटत आहे. शाळा कधी सुरू होते आणि कधी एकदाची मी शाळेत जाते असे झाले आहे.
- हिमांशू पाऊलझगडे, विद्यार्थी, किडंगीपार.
..........
शिक्षक
मागील वर्षात कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारने ऑनलाइन शिक्षण सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय परिसरात शिक्षकांच्या उपस्थितीत शिक्षणाचे धडे, बालपणातील खेळण्या-बागडण्याचा शाळेतील आनंद आहे मिळाला नाही. अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने यावर्षी सरकार काय निर्णय घेते याची आम्हालाही उत्सुकता आहे.
प्रकाश ब्राह्मणकर, शिक्षक, अंजोरा
.........
पालक
शाळेची बरोबरी ऑनलाइन शिक्षणाला येऊ शकत नाही. मुलांना घरी बसण्याचा कंटाळा आला आहे. काही दिवस ऑनलाइन शिक्षण घेतले. मात्र त्यामुळे मुलांना फक्त मोबाइलचा जास्त छंद लागला. ऑनलाइन शिक्षणाचा प्रभाव मुलांवर फारसा पडलेला नाही. गेल्या वर्षभरापासून शाळा नसल्याने माझी दोन्ही मुले घरातच बसून आहेत.
तेजराम पाथोडे, पालक, जवरी