गोंदिया मेडिकलमधील डॉक्टरच कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 06:33 PM2020-07-09T18:33:34+5:302020-07-09T18:35:00+5:30
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) एका डॉक्टरसह दोन जणांचे स्वॅब नमुने गुरूवारी (दि.९) कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आणखी तीन कोरोना बाधितांची भर पडली. तर संबंधित डॉक्टर हा रुग्ण आणि अनेक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला असल्याने मेडिकलमध्ये खळबळ उडाली
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) एका डॉक्टरसह दोन जणांचे स्वॅब नमुने गुरूवारी (दि.९) कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आणखी तीन कोरोना बाधितांची भर पडली. तर संबंधित डॉक्टर हा रुग्ण आणि अनेक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला असल्याने मेडिकलमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान संपर्कात आलेल्यांना ट्रेस करुन जवळपास वीस जणांचे स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर सध्या मेडिकल आणि गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे गुरूवारी प्राप्त झालेल्या स्वॅब नमुन्याच्या अहवालावरुन स्पष्ट झाले.अहवाल प्राप्त होताच मेडिकलमधील डॉक्टर, कर्मचारी आणि इतर रुग्णांमध्ये खळबळ उडाली होती. हे डॉक्टर ज्या विभागात कार्यरत होते त्यांच्या संपकार्तील २० जणांना क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे मेडिकलच्या अधिकाºयांनी सांगितले. गुरूवारी आढळलेल्या एकूण तीन कोरोना बाधितांमध्ये एक मेडिकलचे डॉक्टर आणि दुसरे दोन रुग्ण हे आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील आहे. या दोन्ही रुग्णांना बाहेरील प्रवासाची हिस्ट्री आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली असतानाच जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले चार कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९५ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १३० कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या स्थितीत जिल्ह्यात एकूण ६३ कोरोना कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहे.
४८९१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ५०८६ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. यापैकी १९५ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ४८९१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर २२१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये सर्वेक्षण सुरू
जिल्ह्यातील १७ कंटेन्मेंट झोनमधील मधूमेह, उच्च रक्तदाब तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यासाठी ९८ चमू व ३४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.