पर्युषण पर्वावरही कोरोनाचे परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 08:46 PM2020-08-17T20:46:20+5:302020-08-17T20:47:39+5:30
दिगांबर जैन मंदिराला यंदा १०० वर्षे पूर्ण झाले असून तेथेच नवीन मंदिर १४ वर्षापूर्वी तयार करण्यात आले आहे. लाल दगडाने सुंदर असे मंदिर तयार करण्यात आले आहे. पर्युषण पर्व हा जैन समाजाचा सर्वात मोठी आराधना करण्याचा पर्व असतो. त्याग व तपस्येचा हा पर्व असून यामध्ये जैन बांधव सकाळी ५ वाजता उठून १० दिवस त्यांच्या देवांचे पूजन, अभिषेक व शांतीधारा करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनामुळे यंदा सर्वच धर्मीयांच्या सणासुदीवर परिणाम पडत असतानाच दिगांबर जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वावरही त्याचे परिणाम जाणवत आहेत. कोरोनामुळे येथील जैन मंदिरात कोणतेही कार्यक्रम होणार नसून पर्युषण पर्व प्रत्येक जैन बांधवाने घरातच राहून साजरा करावा असे दिगांबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय जैन यांनी कळविले आहे.
येथील दिगांबर जैन मंदिराला यंदा १०० वर्षे पूर्ण झाले असून तेथेच नवीन मंदिर १४ वर्षापूर्वी तयार करण्यात आले आहे. लाल दगडाने सुंदर असे मंदिर तयार करण्यात आले आहे. पर्युषण पर्व हा जैन समाजाचा सर्वात मोठी आराधना करण्याचा पर्व असतो. त्याग व तपस्येचा हा पर्व असून यामध्ये जैन बांधव सकाळी ५ वाजता उठून १० दिवस त्यांच्या देवांचे पूजन, अभिषेक व शांतीधारा करतात. दररोज दुपारी स्वाध्याय आणि समायीक केले जाते. रात्रीला आरती व बाहेरून येणाऱ्या पंजितांकडून प्रवचनमाला होते. रात्री ९ वाजता विविध सांस्कृतिक व बौद्धीक कार्यक्रम केले जाते. हे सर्व कार्यक्रम १०० वर्षापासून केले जात आहेत.
समाजातील तरूण व वृद्ध आपल्या शक्तीनुसार तप व आराधनेत उपवास करतात. जैन धर्मीय २४ तासात केवळ १ तास एकच वेळी पाणी पितात. त्यानंतर पुन्हा २४ तासात पाणी घेतात व आपापल्या शक्तीनुसार उपवास ठेवतात. हे उपवास ३ ते १० दिवस केले जातात. तपस्येच्या आधारावर जैन धर्म चालत असून पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या देवाचा अभिषेक करून भगवनाजीची प्रतिमा विराजमान करून शोभायात्रा काढली जाते.
मात्र यंदा कोरोनामुळे व सर्व धर्मगुरूंच्या मार्गदर्शनानुसार तसेच शासन नियमानुसार येथील दिगांबर जैन समाजानेही सहयोग देण्याच्या दृष्टीने विश्व कल्याणासाठी सर्व कार्यक्रमांना रद्द केले आहे. यावर्षी कोणत्याही कार्यक्रमासाठी मंदिर उघडले जाणार नाही असे सांगीतले आहे.
पर्युषण पर्वाच्या या १० दिवसांत दिगांबर जैन समाजबांधवांनी नियमानुसार पूजापाठ व तपस्या आपापल्या घरीच राहून करावी. घरालाच मंदिराचे स्वरूप द्यावे व दरवर्षी प्रमाणे आपला नित्यक्रम ठेवावा.
-संजय जैन
अध्यक्ष, दिगांबर समाज गोंदिया
यंदा मुनीश्री येणार नाहीत
दरवर्षी पर्युषण पर्वात प्रवचन करण्यासाठी संत व मुनीश्री गोंदियात दाखल होतात. जैन बांधव त्यांच्या अमृतवाणीचे रस ग्रहण करतात. परंतु कोरोना संकटाला पाहून यंदा प्रवचनासाठी येथील दिगांबर जैन मंदिरात किंवा कुठेही संत व मुनिश्री येणार नाहीत असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे घरातूनच पर्युषण पर्व साजरा होणार आहे.