गोरेगाव व आमगाव तालुक्यातही कोरोनाची एंट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:30 AM2021-09-19T04:30:21+5:302021-09-19T04:30:21+5:30
गोंदिया : कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर असलेल्या जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने कोरोना पुन्हा पाय पसरताना दिसत आहे. ...
गोंदिया : कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर असलेल्या जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने कोरोना पुन्हा पाय पसरताना दिसत आहे. गोंदिया तालुका पाठोपाठ आता गोरेगाव व आमगाव तालुक्यातही कोरोनाची एंट्री झाली असून एकूण बाधितांची संख्या ५ झाली आहे. यामुळे आतापासूनच खबरदारी घेण्याची गरज आहे.
जून महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात दिसत होती व दररोज बाधितांची आकडेवारी १-२ किंवा बहुतांश वेळी शू्न्य नोंदविली जात होती. यामुळेच जिल्हा आता कोरोनामुक्त होणार असेही वाटत होते. अशात जिल्हावासीयांना रान मोकळे झाले कोरोना नियमांना बाजूला सारून त्यांचा मोकाट वावर दिसून येत आहे. असे असतानाच आता कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया तालुक्यात कोरोनाने एंट्री केली व तब्बल ३ बाधित निघाले. त्यानंतर आता शनिवारी (दि.१८) गोरेगाव व आमगाव तालुक्यात प्रत्येकी १ बाधित निघाला आहे. म्हणजेच, आता गोंदिया तालुक्यासह गोरेगाव व आमगाव तालुक्यातही कोरोना शिरला आहे. कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या जिल्ह्यात आता ५ बाधित झाल्याने हे चित्र बघता जिल्ह्यात कोरोना पुन्हा एकदा आपले पाय पसरत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, कोरोनाच्या दोन लाटांनी केलेला कहर आजही थरकाप उडविणारा आहे. त्यानंतरही नागरिकांकडून होत असलेले नियमांचे उल्लंघन हे संयुक्तिक नाही. त्यामुळे आता पुन्हा तीच स्थिती उद्भवू नये यासाठी आतापासून कोरोना नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
------------------------------
लस घेतल्यानेच मिळणार सुरक्षा कवच
कोरोनापासून बचावासाठी शासनाकडून लस मोफत दिली जात आहे. शिवाय लस घेतलेल्यांना कोरोना गंभीर स्थितीत नेऊ शकत नसल्याचेही अभ्यासातून स्पष्ट झाले आहे; मात्र त्यानंतरही नागरिकांकडून लसीकरणाला बगल दिली जात आहे. त्यातही महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, लस घेतलेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तींना संसर्गाची शक्यता नसते. एकंदर लसीमुळेच आता कोरोनाला हरविता येणार असून लस हेच सुरक्षा कवच असल्याने लवकरात लवकर प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.