कोरोना महामारीत गाव समस्यांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:58+5:302021-05-10T04:28:58+5:30
केशोरी : मागील एक वर्षापासून ओढावलेल्या कोरोना विषाणूच्या महामारीने गावातील समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील अनेक गावांचा विकास ...
केशोरी : मागील एक वर्षापासून ओढावलेल्या कोरोना विषाणूच्या महामारीने गावातील समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील अनेक गावांचा विकास खुंटल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोरोनाविषयी भीती निर्माण झाली आहे. शासकीय निर्बंधामुळे सर्व कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. कार्यालयात जाऊन गाव विकास समस्या सांगून पाठपुरावा करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा वेग मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे.
उन्हाळ्यातील एप्रिल, मे हे दोन महिने गाव विकासाची कामे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जातात. परंतु, गेल्या एक वर्षापासून कोरोनाच्या महामारीने लोकप्रतिनिधी धास्तावले आहेत. यावर्षी तर मार्च महिन्यापासून केशोरी आणि परिसरात कोरोना संसर्गाचा विस्फोट झाल्याने संचारबंदी घोषित करून लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या योजनेंतर्गत दरवर्षी होणाऱ्या गाव विकासाच्या कामांना ब्रेक लागला आहे. प्रशासकीय मंजुरी प्राप्त असूनही कोरोनाच्या भीतीमुळे कोणतीही कामे सुरू करण्यात आली नाही. गावातील रस्त्याची कामे, तलाव, बोडी, खोलीकरणाची कामे, सार्वजनिक रस्ते आणि इतर गाव विकासाच्या कामांना गती देण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी कोरोनाच्या भीतीमुळे कोणत्याही कार्यालयात जाऊन पाठपुरावा करू शकत नाही. मार्च महिन्यात आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केशोरीला भेट देऊन केशोरी येथील बायपास रस्त्याच्या कामाचे नियोजन करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेशित केले. त्यातही कोरोनाचा अडसर निर्माण झाला. या परिसरातील प्रत्येक गावात समस्या आवासून उभ्या आहेत. गरीब आणि दररोज मोलमजुरी करणारी माणसे कामाची वाट पाहत आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामारीने त्यांचे रोजगार हिरावले असून, त्यांच्या उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता गाव समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे हे मात्र निश्चित.