सातगाव साखरीटोला येथे कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:28 AM2021-04-18T04:28:04+5:302021-04-18T04:28:04+5:30
साखरीटोला : दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असून सातगाव-साखरीटोला येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढली असल्याने प्रशासनाने कंटेन्मेंट झोनची घोषणा ...
साखरीटोला : दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असून सातगाव-साखरीटोला येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढली असल्याने प्रशासनाने कंटेन्मेंट झोनची घोषणा केली आहे. १७ एप्रिलला ६९ पर्यत रुग्ण संख्या झाली आहे. त्यामुळे साखरीटोला व सातगाव येथे कोरोनाचा उद्रेक झाला असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सालेकसा तालुक्यातील सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आजपर्यंत एकूण ७७ कोरोना संसर्ग रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. सातगाव येथे ३८, साखरीटोला ३१, उपकेंद्रांतर्गत मक्काटोला येथे २, धानोली १,भजेपार १, गांधीटोला १, दागोटोला २, गिरोला १ अशा रुग्णांची नोंद घेण्यात आली. १७ एप्रिलला प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड चाचणी घेण्यात आली. यात आरटीपीसीआर ४४ तर टेस्ट २३ लोकांची करण्यात आली. अजूनही रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून शासनाने घालून दिलेल्या कोविड नियमाचे पालन करावे तसेच स्वत:हून प्राथमिक आरोग्य केंद्रातून स्वत:ची चाचणी करुन घ्यावी, असे डॉ. अमित खोडणकर, सरपंच नरेश कावरे यांनी कळविले आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याने व्यापारांनी तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डॉ. किरण सोमानी, डॉ.बोपचे, लॅब टेक्नीशियन प्रदीप गिल्ले, आरोग्य सेवक आर.आर.सोनवाने, आरोग्यसेविका डी.बी.मेघात, कोडापे, आरोग्य सहाय्यक बोदे, प्रदीप वाघमारे, बहेकार आदी सहकार्य करीत आहेत.