गोंदिया शहरात कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवशी १८९ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 06:00 AM2020-09-04T06:00:00+5:302020-09-04T06:00:06+5:30
गुरूवारी (दि.३) जिल्ह्यात एकाच दिवशी १८९ कोराना बाधित आढळले असून यात सर्वाधिक १२१ रुग्ण गोंदिया शहरातील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दहा बारा दिवसांपासून गोंदिया शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दोन आकडी रुग्ण संख्या आता तीन आकडी झाली आहे. गुरूवारी (दि.३) जिल्ह्यात एकाच दिवशी १८९ कोराना बाधित आढळले असून यात सर्वाधिक १२१ रुग्ण गोंदिया शहरातील आहे. दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. गोंदिया शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असून रुग्ण वाढीने कोरोनाचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर सर्वाधिक ९१ रुग्ण आढळले होते. मात्र सप्टेबर महिन्याच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी १३७ रुग्ण आढळले होते. तर गुरूवारी १८९ कोरोना बाधित आढळले. तर आमगाव आणि बालघाट येथील प्रत्येकी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.
बुधवारपासून (दि.२) जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग तीन आकडी झाला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागील तीन दिवसांपासून सर्वाधिक कोरोना बाधित हे गोंदिया आणि आमगाव तालुक्यात आढळत असल्याने ही दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट आणि उद्रेकाचे केंद्र झाले आहे.
कोरोना संसर्ग वेगाने वाढत असताना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार सुध्दा पुढे येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एकीकडे कोरोना संसर्ग वाढत असताना दुसरीकडे जिल्हा प्रशासन सैल झाल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.३१) केटीएसमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांने माझ्या वडिलांचा मृत्यू हा येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप केला होता. यासर्व प्रकाराचा व्हिडिओ सुध्दा चांगलाच व्हायरल झाला. मात्र यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचीे दखल घेवून साधी चौकशी करण्याचे आदेश दिले नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या काळात येथील प्रशासन किती गंभीर आहे दिसून येते.
गोंदिया शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. बुधवार आणि गुरूवारी जिल्ह्यात एकूण ३२५ कोरोना बाधित आढळले तर तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना रुग्ण वाढीचा वेग तिप्पट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वत:ची काळजी घेत खबरदारी बाळगण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नियमित हातपाय स्वच्छ धुवावे, मास्कचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंग आणि आरोग्य विभागाने दिलेल्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.
आरोग्य यंत्रणेवर नियंत्रण कुणाचे
जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आले. मात्र अजुनही रेफर टू नागपूर करण्याची पध्दत सुरू आहे. केटीएस असो वा बीजीडब्ल्यू रुग्णालयात रुग्णांना वेळीच उपचार मिळत नाही. आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. तक्रारींचा खच वाढत असताना जिल्हा प्रशासन सुध्दा बघ्याची भूमिका पार पाडीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.