आता गोंदिया व आमगाव तालुक्यातच कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:34+5:302021-09-26T04:31:34+5:30
दुसऱ्या लाटेचा कहर आजही अंगावर थरकाप आणणारा आहे. ते दिवस आठवू नये व कधी परतून येऊ नये, अशीच कामना ...
दुसऱ्या लाटेचा कहर आजही अंगावर थरकाप आणणारा आहे. ते दिवस आठवू नये व कधी परतून येऊ नये, अशीच कामना सर्व जिल्हावासी करतात. यातूनच जास्तीत जास्त लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाची धडपड सुरू आहे. एप्रिल व मे महिन्यात दुसऱ्या लाटेने कहर केल्यानंतर जून महिन्यापासून जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात आली होती. दररोज निघणारे बाधित नियंत्रणात आले व त्यामुळे फक्त १ किंवा २ बाधितांवर आकडा आला होता. यामुळे जिल्हा नियंत्रणात दिसून येत होता.
मात्र मागील आठवड्यात बाधितांची संख्या अचानक वाढताना दिसली व तब्बल ९ बाधितांची नोंद जिल्ह्यात झाली होती. यात धोकादायक बाब म्हणजे, गोंदिया तालुक्यात कोरोनाची एंट्री झाली व आजघडीला ४ बाधित तालुक्यात आहेच, तर आमगाव तालुक्यात ३ बाधित असून अशाप्रकारे जिल्ह्यात ७ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील गोंदिया व आमगाव तालुक्यात कोरोना दिसून येत आहे.
-----------------------------
सणासुदीवर विरजण नको असल्यास नियम पाळा
बाप्पाने आता निरोप घेतला असून, जेमतेम १० दिवसांवर नवरात्र आला असून त्यानंतर दिवाळी येत आहे. जिल्ह्यातील नवरात्रीची दूरवर ख्याती असून दूरवरून लोक येथे येतात. शिवाय दिवाळी हा सर्वांचाच आवडीचा सण असल्यानेही पाहुण्यांची रेलचेल व खरेदीची गर्दी असते. नेमके हेच वातावरण कोरोनाला पाय पसरायला पोषक असते. यामुळे आपल्या सणासुदीवर विरजण घालायचे नसल्यास तोंडावर मास्क व शारीरिक अंतराचे पालन सक्तीने करण्याची गरज आहे.
-----------------------------
लसीकरण टाळू नका
कोरोनापासून आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. कारण, लसीकरण झालेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तीला संसर्ग होत नसल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. अशात प्रत्येकाने लस घेतल्यास कुणालाही कोरोनाचा धोका राहणार नाही. याकरिता लसीकरण टाळणे धोक्याचे असून, त्वरित डोस घेण्याची गरज आहे.