जिल्ह्यात कोरोना वाढला : सॅनिटायझरचा वापर मात्र घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:30 AM2021-03-16T04:30:33+5:302021-03-16T04:30:33+5:30
गोंदिया : मागील वर्षी सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग हेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वपूर्ण शस्त्रे होती. कोरोनामुळे ...
गोंदिया : मागील वर्षी सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग हेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वपूर्ण शस्त्रे होती. कोरोनामुळे मास्क, सॅनिटायझर या गोष्टींची माहितीसुद्धा नागरिकांना प्रथमच झाली. कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्या मागणीतसुद्धा प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळेच त्यांचा तुटवडा निर्माण होऊन अतिरिक्त दरानेसुद्धा ते ग्राहकांना खरेदी करावे लागले. मात्र, मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मास्क, सॅनिटायझरच्या मागणीत घट झाली होती. पण, आता जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असले तरी मास्क, सॅनिटायझरच्या मागणीत फारशी वाढ झालेली नाही. सध्या केवळ १० ते १५ टक्के मास्क, सॅनिटायझरची विक्री होत असल्याचे मेडिकल संचालकांनी सांगितले. एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिकांनी पुन्हा या गोष्टींचा वापर कमी केल्याचे चित्र असल्याने हे दुर्लक्ष करणे नागरिकांना पुन्हा भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा संसर्ग अद्यापही पूर्णपणे कमी झाला नसृून मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे.
.......
कोट
मागील वर्षीच्या तुलनेत मास्क, सॅनिटायझर यांच्या विक्रीत बरीच घट झाली आहे. सध्या केवळ १५ ते २० टक्केच मास्क, सॅनिटायझरची विक्री होत आहे. तर, मेडिकलशिवाय इतर दुकानांमध्ये ते सहज उपलब्ध होत असल्याने मेडिकलचा सेल कमी झाला आहे. तर, ग्राहकांची मागणीसुद्धा कमी झाली आहे.
- उत्पल शर्मा, अध्यक्ष केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन
..
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी आम्ही नियमित मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करतो. कुटुंबीयांनासुद्धा याची काळजी घेण्यास सांगतो. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हेच प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे सर्वांनीसुद्धा याचा नियमित वापर करून कोरोनाला हद्दपार करण्यास मदत करावी.
- एल.यू. खोब्रागडे, शिक्षक
....
मी आणि माझे कुटुंब आम्ही नियमितपणे मास्क, सॅनिटायझरचा वापर करतो. तसेच घरातील लहान मुलांनासुद्धा घराबाहेर पडताना या गोष्टींची काळजी घेण्यास सांगतो. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून आम्ही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले नाही.
- रवींद्र अंबुले, शिक्षक
...................
मागील वर्षीची विक्री
९० टक्के
यावर्षीची सॅनिटायझरची विक्री
१५ टक्के
यावर्षीची मास्क विक्री
२० टक्के
.........
७० टक्के विक्रीत घट
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता, तेव्हा दररोज ९० टक्के मास्क आणि सॅनिटायझरची विक्री होत होती. पण, आता मास्क आणि सॅनिटायझरचा सेल २० टक्क्यांवर आला असून ७० टक्के विक्रीत घट झाली असल्याचे गोंदिया शहरातील मेडिकल व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
.......
मास्क आणि सॅनिटायझर हे मेडिकलशिवाय इतर दुकानांत विक्रीसाठी ठेवता येतात. त्यामुळे ते इतर दुकानांमध्येसुद्धा उपलब्ध होत असल्याने मेडिकलमधून मास्क, सॅनिटायझरचा सेल फार कमी झाला आहे.
.....
सद्य:स्थितीत एका मेडिकलमधून १० ते १५ बॉटल सॅनिटायझरची विक्री होत आहे. कोरोना प्रकोपाच्या काळात हाच सेल ४० ते ५० बॉटलपर्यंत होता.
......
जिल्ह्यात मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाला होता. त्यामुळे ग्राहकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे कमी केले होते. त्यामुळेसुद्धा मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत घट झाली आहे.