बीजीडब्ल्यू रुग्णालयातच होणार कोरोना बाधित गर्भवतींची प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 05:00 AM2020-09-11T05:00:00+5:302020-09-11T05:00:42+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून शहर कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. त्यातच कोरोनाबाधित गर्भवतींचा कोणीच वाली नसून कोरोनाबाधित महिलांची प्रसूती करण्यासाठी रजेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात व्यवस्था करण्यात आली होती. मात्र तेथे डॉक्टर नसल्याने गर्भवतींना थेट नागपूर रेफर केले जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधित महिलांची प्रसूती येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात न करता त्यांना नागपूरला रेफर केले जात होते. लोकमतने हा मुद्दा दोन दिवस लावून धरला होता. तसेच याची तक्रार माजी आ.गोपालदास अग्रवाल यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. याचीच दखल घेत आरोग्य मंत्री टोपे यांनी कोरोना बाधित गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी नागपूर येथे रेफर न करता गोंदिया येथील बीजीडब्ल्यू रुग्णालयातच प्रसूती करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून शहर कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. त्यातच कोरोनाबाधित गर्भवतींचा कोणीच वाली नसून कोरोनाबाधित महिलांची प्रसूती करण्यासाठी रजेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात व्यवस्था करण्यात आली होती. मात्र तेथे डॉक्टर नसल्याने गर्भवतींना थेट नागपूर रेफर केले जात होते. लोकमतने हा प्रकार लावून धरला. माजी आमदार अग्रवाल यांच्याकडे सुध्दा यासंदर्भात भरपूर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या आधारे अग्रवाल यांनी आरोग्य मंत्री टोपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे, अधिष्ठाता डॉ.विनायक रूखमोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भूषण रामटेके यांच्याशी फोनवर चर्चा करून नाराजी व्यक्त केली होती. तसेच आरोग्यमंत्री टोपे यांना कोविड बाधित गर्भवतींच्या प्रसूतीसाठी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. यावर आरोग्य मंत्री टोपे यांनी डॉ.रूखमोडे व डॉ. रामटेके यांना योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. आरोग्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आता येथील बाई गंगाबाई रूग्णालयात कोरोना बाधित महिलांच्या प्रसूतीसाठी व्यवस्था केली जाणार आहे. गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुुबीयांची पायपीट कमी होणार आहे.
आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता कोविड बाधित गर्भवतीची प्रसूती बीजीडब्ल्यू रुग्णालयातच केली जाणार आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही.
-गोपालदास अग्रवाल,
माजी आमदार
आठवडाभरात होणार व्यवस्था
बाई गंगाबाई महिला रुग्णालयात कोरोना बाधित गर्भवती महिलांची प्रसूती करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष तयार केले जाणार आहे. यासाठी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी नागपूर येथे रेफर न करता याच रुग्णालयात प्रसूती केली जाणार आहे.