पहिली लाट रोखलेल्या ८०० गावांत कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:31 AM2021-04-28T04:31:50+5:302021-04-28T04:31:50+5:30
गोंदिया : कोरोना विषाणूने जगात थैमान घातले. गोंदिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत ...
गोंदिया : कोरोना विषाणूने जगात थैमान घातले. गोंदिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत गेला. जिल्ह्यातील २ शहरांसोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक झाला. जिल्ह्यातील एकूण ९४४ गावांपैकी पहिल्या लाटेत ११२ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता; परंतु त्यातील ८३२ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखून धरले होते; पण दुसरी लाट येताच जिह्यातील उर्वरित ८०० गावांतही लाट झपाट्याने पसरली.
पहिल्या लाटेत ग्रामपंचायतींनी बाहेरून येणाऱ्यांना शाळेतच अलगीकरण, विलगीकरण केले. त्यांनी कोरोनासंदर्भात नियम पहिल्या लाटेत तंतोतंत पाळण्यात आल्याने गावात पाहिजे त्या प्रमाणात शिरकाव झाला नाही; परंतु दुसऱ्या लाटेत लोकांनी नियमाला बगल दिली आणि गावात कोरोनाने रौद्ररूप धारण केले. पहिल्या लाटेत जी गावे कोरोनामुक्त होती, अशी कोरोनामुक्त असलेल्या ८०० गावांत कोरोनाचा उद्रेक झाला. गावकऱ्यांकडून गावात कोरोना रोखण्यासाठी समित्या तयार करण्यात आल्या होत्या. त्या समित्या दुसऱ्या लाटेत निष्क्रिय झाल्याने दुसरी लाट झपाट्याने आली. महाराष्ट्र शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या उपक्रमाकडे झालेले दुर्लक्ष व लग्न समारंभातील गर्दीने कोराेनाला बळ मिळाले. परिणामी, गावागावात कोरोनाच्या संसर्ग वाढत आहे.
.............................
जिल्ह्यातील एकूण गावे- ९४४
सध्या कोरोना रुग्ण असलेली गावे- ७३२
कोरोनामुक्त गाव-२१२
.......
दुसऱ्या लाटेत या गावांत पोहचला कोरोना
- पहिल्या लाटेत कोरोनापासून दूर असलेल्या ठाणा, बोथील, शिवणी, बोरकन्हार, बाम्हणी, महारीटोला, अंजोरा, खमारी, आसोली, इर्री, कातुर्ली, करंजी भोसा, पिपरटोला, कोहळीटोला, शिलापूर, डवकी, सोनारटोला, दागोटोला ही गावे दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या संसर्गामुळे त्रस्त झालेली आहेत.
- रिसामा, किडंगीपार, गोरठा, मानेगाव, धावडीटोला, अदासी, गुदमा, चुलाेद, तुमखेडा खुर्द, झालीया, पिपरटोला, सावंगी, दरबडा, घोन्सी, बोदलबोडी, नानव्हा, खेडेपार, फुटाणा, मुरदोली अशी अनेक गावे दुसऱ्या लाटेत कोरोनाला आमंत्रण देऊन अनेकांचा बळी गेला.
..........
आमचे काय चुकले
पहिल्या लाटेत जोमाने कार्य झाले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्व लोक आपापल्या कामात व्यस्त झाल्याने जणू कोरोना हद्दपारच झाला आहे. या पद्धतीने लोक वागू लागले. आम्हीदेखील बिनधास्त झालो होतो, त्यामुळे कुणीच या दुसऱ्या लाटेकडे लक्ष दिले नाही. दुर्लक्ष करणे महागात पडले.
-राजकुमार चव्हाण सरपंच बोथली.
......
पहिली लाट ओसरत असताना कोरोनाच्या नियमांना बगल देत गावकरी ज्या पद्धतीने वागले. कुणी कुठूनही आल्यावर त्यांना गृह विलगीकरण किंवा संस्थात्मक अलगीकरण, विलगीकरण ही प्रथाच बंद केल्याने कोरोनाची दुसरी लाट भयानक आली.
- भोजराज ब्राह्मणकर, सरपंच बोरकन्हार
.......
पहिल्या लाटेत तोंडाला मास्क बांधा, सॅनिटायजरचा वापर करा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, असे सांगून जनजागृती केली. ती गोष्ट लोकांनी ऐकली. मात्र, लस आल्याने धास्तावलेले लोक बिनधास्त झाले. परिणामी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गाव कोरोनामुक्त राहिले नाही. लोकांचा बेजबाबदारपणा दुसऱ्या लाटेला कारणीभूत आहे.
- रोशनी भुते, सरपंच, शिलापूर
......
बॉक्स