कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांना ५६ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:55 AM2021-03-04T04:55:04+5:302021-03-04T04:55:04+5:30
नरेश रहिले गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासन व प्रशासनाने हलगर्जीपणाने वागणाऱ्या लोकांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली. ...
नरेश रहिले
गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासन व प्रशासनाने हलगर्जीपणाने वागणाऱ्या लोकांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या संसर्गाला घेऊन सुरुवातीपासून आतापर्यंत करण्यात आलेल्या दंडापोटी एक लाख ४७ हजार ५३७ लोकांकडून ५५ लाख ९३ हजार ९०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही कारवाई मार्च २०२० ते २६ फेब्रुवारी २०२१ या काळातील आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाही लोक फिजिकल डिस्टन्स न ठेवता गर्दी करतात. तसेच तोंडाला मास्क न लावता बिनधास्त फिरत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील आठही तालुक्यात ही कारवाई करण्यात आली असून महसूल विभाग, नगर परिषद प्रशासन व पोलीस विभागाने केलेल्या कारवाईतून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. मार्च २०२० ते २६ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान फिजिकल डिस्टन्स न ठेवणाऱ्या १ हजार ६९२ जणांकडून १६ लाख १० हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर मास्क न लावता मुक्त संचार करणाऱ्या लोकांवर पहिल्या लाटेत ५०० रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. दुसऱ्यावेळी म्हणजेच १६ फेब्रुवारीपासून मास्क न लावणाऱ्यांवर १०० रुपये दंड आकारला जात आहे.
सुरुवातीपासून २६ फेब्रुवारीपर्यंत मास्क न लावणाऱ्या १ लाख ४५ हजार ८४५ लोकांकडून ३९ लाख ८३ हजार ७०० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला आहे. दंड म्हणून वसूल करण्यात आलेली रक्कम जिल्हा प्रशासनाकडे आहे. या रकमेची काय विल्हेवाट लागते, याकडे लक्ष आहे.
-----------------------
१० दिवसांत तीन लाखांची वसुली
१६ ते २६ फेब्रुवारी या १० दिवसांत करण्यात आलेल्या कारवायांत ३ लाख ५ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यात फिजिकल डिस्टन्सच्या ७७ प्रकरणांतून ७ हजार ७०० रुपये, तर मास्क न वापरणाऱ्या २ हजार ९७७ लोकांकडून दोन लाख ९७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या १० दिवसांच्या काळात तीन लाखांवर दंड वसूल करण्यात आला आहे.
-------------------------
कारवायांत वाढ करण्याची गरज
पोलिसांनी मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असल्याने आता काही प्रमाणात नागरिक मास्क लावून फिरताना दिसत आहेत. मात्र, सुरुवातीच्या काळात ज्या सक्तीने कारवाया करण्यात आल्या तेवढी सक्ती सध्या दिसून येत नाही. परिणामी, कित्येक नागरिक मास्क व लावता फिरताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, मास्क न लावता कित्येक जण रस्त्याने जाता-जाता थुंकत असल्याने कोरोना प्रसाराचा धोका वाढणार यात शंका नाही. परिणामी, अशांवर जबर कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.