कोरोना केवळ शहरातील शाळांतून पसरतोय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:31 AM2021-08-26T04:31:19+5:302021-08-26T04:31:19+5:30
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालय बंद आहेत. ऑनलाइनवर या शाळांची मदार सुरू होती; मात्र मागील दोन महिन्यांपासून ...
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालय बंद आहेत. ऑनलाइनवर या शाळांची मदार सुरू होती; मात्र मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला. गोंदिया जिल्हादेखील कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल करीत सर्व व्यवहार सुरळीत केले; मात्र शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. तर ग्रामीण भागात शालेय व्यवस्थापन आणि ग्रामपंचायतचा ठराव घेऊन आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश असले तरी पाचव्या वर्गापासून शाळा भरत असल्याचे चित्र आहे. दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकसुद्धा त्रस्त झाले आहे. अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार असून, ते मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडे यासंदर्भात चौकशी करीत आहेत; पण शासन स्तरावर यासंदर्भात कुठलाच निर्णय झाला नसल्याने त्यांचीदेखील अडचण झाली आहे. ग्रामीण भागातील शाळा महिनाभरापासून सुरळीत असून, एकही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे ऐकिवात नाही. मग शहरातील भागातील शाळा सुरू करण्यास नेमकी अडचण काय, असा सवाल पालक आणि काही शाळांकडूनदेखील उपस्थित केला जात आहे.
.......
शहराकडून ग्रामीण भागाकडे
शहरी भागातील शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. त्यातच ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील काही खासगी शाळांनी तुकड्या टिकविण्यासाठी आता शहरी भागातील विद्यार्थ्यांना टार्गेट केले आहे. शहरातील नगर परिषदेच्या शाळांमधून टीसी काढण्यासाठी पालक दररोज येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर समस्या निर्माण झाली आहे.
.............
जिल्ह्यात १६३० शाळा
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १०६९, अनुदानीत ३४०, विनाअनुदानीत २६० इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा असून, यात अडीच लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने ऑनलाइनवर या शाळांचा कारभार सुरू आहे.
.................
ऑनलाइन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले
मागील दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांना शाळेचे दर्शन झाले नाही. बहुतेक विद्यार्थी घराबाहेरसुद्धा पडले नाहीत. तर चार ते पाच तास मोबाइलवर ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. याचा आता विद्यार्थ्यांनासुद्धा कंटाळा आला आहे. तर पालकांनासुद्धा त्यांच्या पाल्यांची चिंता हाेऊ लागली आहे.