गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक : १८९ पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 08:46 PM2020-09-03T20:46:40+5:302020-09-03T20:47:00+5:30
गोंदिया जिल्ह्यात 1 सप्टेंबरला 62 रुग्ण, 2 सप्टेंबरला 137 रुग्ण आणि आज 3 सप्टेंबरला 189 रुग्ण आढळले आहे. ही विक्रमी संख्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसगार्मुळे रूग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. बाधित दोन रुग्णांचा उपचारादरम्यान गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊन 189 जणांना बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. 34 रुग्ण उपचारातुन कोरोनामुक्त झाले आहे.वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. मागील महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. या सप्टेंबर महिन्यात देखील कोरोना बाधितांचा आलेख देखील वेगाने वाढत आहे. 1 सप्टेंबरला 62 रुग्ण, 2 सप्टेंबरला 137 रुग्ण आणि आज 3 सप्टेंबरला 189 रुग्ण आढळले आहे. ही विक्रमी संख्या आहे.
आमगाव येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या 62 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैहर येथील किडनी विकाराच्या उपचारासाठी गोंदिया आलेल्या 45 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तर 34 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ताप, खोकला, सर्दी असलेल्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गोंदिया शहरातील नागरिकांनी 8 ठिकाणी सुरु असलेल्या तपासणी केंद्रामध्ये जावून स्वॅबचे नमूने देवून कोरोनाविषयक चाचणी करुन घ्यावी.तसेच कोरोनविषयक मार्गदर्शक सुचनांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके यांनी केले आहे.