कोरोना होऊन गेला ; इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी ? संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:27 AM2021-09-13T04:27:26+5:302021-09-13T04:27:26+5:30
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व आजारांकडे दुर्लक्ष करून फक्त कोरोना रुग्णांकडेच लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यामुळे शेकडो ...
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व आजारांकडे दुर्लक्ष करून फक्त कोरोना रुग्णांकडेच लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यामुळे शेकडो लोक आजार घेऊनच जगत होते. आपली शस्त्रक्रिया होईल यासाठी ते शासकीय रुग्णालयाच्या चकरा मारीत होते. परंतु त्यांच्याकडे लक्ष देणारा कुणीच वाली नव्हता. तारीख पे तारीख देऊन रुग्णांची शस्त्रक्रिया न करता परत पाठविले जात आहे. ज्या लोकांनी आपला वशिला लावला त्यांच्या लोकांची शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यांची ओळख किंवा पैसे नाहीत अशा गोरगरिबांचा वाली कुणीच दिसून आला नाही. शस्त्रक्रियेसाठी यायचे आणि गोळ्या घेऊन जायचे. हाच नित्यक्रम दिसून आला. जिल्ह्यात सन २०२१ या वर्षात ८२१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यातील ५२७ शस्त्रक्रिया ह्या ऑगस्ट महिन्यात करण्यात आल्या. परंतु शेकडो लोक आपल्या आजाराच्या शस्त्रक्रिया कधी होतील यासाठी पायपीट करीत आहेत.
....................
इमर्जन्सी शस्त्रक्रिया
-पोटात असलेले अल्सर, अपेंडीक्स अशा इमर्जन्सी किंवा अपघातामुळे जीव जाण्याची शक्यता असल्यास अशा शस्त्रक्रिया केल्या जातात.
- एखाद्या आजारातील रुग्णाची शस्त्रक्रिया न झाल्यास त्या रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो अशा रुग्णाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात.
..............
प्लान शस्त्रक्रिया
- महिलांच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर खूप टाळाटाळ करतात. त्यांना वेळ लागेल म्हणून सरळ नागपूरला जाण्याचाही सल्ला देतात.
- हायड्रोसीलसारख्या आजाराची शस्त्रक्रिया न करता रूग्णांना औषध देऊन घरी पाठविले जाते. रुग्ण रुग्णालयाच्या चकरा मारून कंटाळलेले आहेत.
..............
शस्त्रक्रियेसाठी महिनाभरानंतरच या...
सामान्य आजारांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर टाळाटाळ करतात. आजार घेऊन जगणाऱ्या व्यक्तीला आजारातून सुटका करण्यासाठी शस्त्रक्रिया कधी होईल असे वाटते. परंतु डॉक्टर त्या रुग्णांना तारीख पे तारीख देऊन परत पाठवितात. महिनाभर येऊ नका त्यानंतर दाखवा मग मी तुम्हाला ऑपरेशनची तारीख देतो असे म्हणून रुग्णांना परत पाठविले जाते.
............
कोरोनाचे एकूण रुग्ण-४१२११
बरे झालेले रूग्ण- ४०४९८
एकूण कोरोनाचे बळी-५७६
सद्या उपचार सुरू असलेले रूग्ण-०७