कोरोना जनजागृतीला लागतोय निधीमुळे ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:29 AM2021-03-26T04:29:01+5:302021-03-26T04:29:01+5:30
देवरी : केंद्र आणि राज्यशासनातर्फे कोरोना जनजागृती व्यापक स्तरावर केली जात आहे. मात्र तालुकास्तरावर अद्यापही व्यापक स्वरुपात जनजागृती केली ...
देवरी : केंद्र आणि राज्यशासनातर्फे कोरोना जनजागृती व्यापक स्तरावर केली जात आहे. मात्र तालुकास्तरावर अद्यापही व्यापक स्वरुपात जनजागृती केली जात नसून आरोग्य विभागाच उदासीन असल्याचे चित्र आहे. याचाच परिणाम कोरोना लसीकरणावर होत आहे. त्यामुळे देवरी तालुक्यात आतापर्यंत केवळ १० टक्केच कोरोना लसीकरण झाले असून, तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक अद्यापही कोविड लसीकरणापासून वंचित असल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिमेला १ मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील दुर्धर आजार असलेल्यांना लसीकरण केले जात आहे. पण याची प्रचार प्रसिद्ध करण्यात देवरी तालुका आरोग्य विभाग पूर्णपणे उदासीन असल्याचे चित्र आहे. येथील ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. लसीकरणासाठी डाटा एन्ट्री करण्यासाठी कर्मचारी नसल्याने नागरिकांना नोंदणी करण्यासाठी बाहेरील आपले सेवा केंद्रावर पाठविले जात आहे. केंद्र संचालक नाेंदणीसाठी ५० ते ६० रुपये शुल्क घेत असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी नोंदणीची सोय नसल्याने त्यांना दूरवर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये लसीकरणाप्रति उदासीनतेचे वातावरण निर्माण होत आहे. कोविड लसीकरणासंदर्भात तालुक्यात कुठलीच जनजागृती करण्यात आली नसून माहिती पत्रक सुध्दा प्रसिद्ध करण्यात आले नाही. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रचार प्रसिद्धसाठी साहित्य आणि निधी मिळाला नसल्याचे सांगितले. एकंदरीत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाची माहिती नसल्याचे चित्र आहे.