कोरोना सुपरफास्ट, जिल्ह्यात भरती रुग्णांची संख्या वाढली, आकडा १२९ वर
By कपिल केकत | Published: April 22, 2023 04:39 PM2023-04-22T16:39:21+5:302023-04-22T16:40:02+5:30
३० बाधितांची पडली भर
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत असून, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशात शनिवारी (दि. २२) आणखी ३० बाधितांची भर पडली असून, फक्त दोन रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. यानंतर आता जिल्ह्यात १२९ ॲक्टिव्ह रुग्ण असून, रुग्णालयात भरती बाधितांची संख्या वाढून पाच झाली आहे.
कोरोनाने जिल्ह्यात एंट्री घेतल्याने सुरुवातील दोन-चार दिवस रुग्णवाढ दिसून आली नाही. मात्र, त्यानंतर आता मागील पाच-सहा दिवसांपासून रुग्णसंख्या २५-३० च्या घरातच दररोज वाढताना दिसत आहे. यातच शनिवारी आणखी ३० बाधितांची भर पडली असून, त्यानंतर आता जिल्ह्यात १२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. घेण्यात आलेल्या २२६ चाचण्यांमध्ये हे ३० बाधित आढळून आले असून, यानंतर आता पॉझिटिव्ही रेशो १३.२ टक्क्यांवर आला आहे. बघता-बघता रुग्णसंख्या १२९ झाली असून, सोबतच भरती रुग्णसंख्येतही वाढ होत असल्याने आता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाल्याचे दिसत आहे.