ग्रामीण भागात कोरोना सुसाट; ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ना आयसोलेशन! (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:28 AM2021-04-18T04:28:19+5:302021-04-18T04:28:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने लोकांना घेऊन जात आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा एकही नियम पाळला ...

Corona Susat in rural areas; No contact tracing or isolation! (Dummy) | ग्रामीण भागात कोरोना सुसाट; ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ना आयसोलेशन! (डमी)

ग्रामीण भागात कोरोना सुसाट; ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ना आयसोलेशन! (डमी)

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने लोकांना घेऊन जात आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा एकही नियम पाळला जात नसल्याने गावेच्या गावे कोरोनाने ग्रस्त होत आहेत. ग्रामीण भागातील लोक कोरोनाला आजही गांभीर्याने घेत नसल्यामुळे ग्रामीण भागात कोरोना सुसाट वेगाने पसरत आहे. याकडे लक्ष द्यायला प्रशासनालाही वेळ नाही, अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या संसर्गाला ग्रामीण भागात सुरूवात झाली आहे. ग्रामीण भागात शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले जात नसल्याने प्रत्यक गावात शेकडो रूग्ण आहेत. ग्रामीण भागातील लोकांची चाचणी होत नाही. कुणाला कोरोना झाला तरी ते चाचणी करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना सुसाट वेगाने पसरत आहे. एखाद्याला कोरोना झाला तरी त्याला मिळेल तसा उपचार करून किंवा दाखल करून घेतले जाते. परंतु, त्याच्या सानिध्यात कोणकोण आले, त्यांची तपासणी, चौकशीही केली जात नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगअभावी ग्रामीण भागात कोरोनाला गती मिळाली आहे. छाेट्या-छोट्या गावात कोरोनाचा उद्रेक होत आहे. लस बाजारात आली म्हणून बिनधास्त झालेल्या लोकांनी कोरोनाला झपाट्याने चालना दिली. ना मास्क ना फिजिकल डिस्टन्स यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. ग्रामीण भागात ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आहेत ते तपासणी करायला पुढे येत नाहीत. कोरोनाच्या संसर्गात लग्न समारंभ, वास्तूपूजन, तेरवी, अंत्यसंस्कार, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांना गर्दी केल्यामुळे कोरोना झपाट्याने पसरला आहे.

.........

गावामध्ये वॉच कुणाचा?

- कोरोनाला आळा घालण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, पोलीसपाटील, रोजगार सेवक, आरोग्य सेवक अशा विविध लोकांची समिती तयार करण्यात आली आहे.

- गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये किंवा कुणाला कोरोना झाला तर इतरांनी त्याच्यापासून दूर राहावे, कोरोनाग्रस्तांनी गृह अलगीकरणात किंवा संस्थात्मक विलगीकरणात राहावे, यावर गावकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु, ते लक्ष देत नाहीत.

.........

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाही

- गावात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगअभावी कोरोनाला गती मिळाली आहे. लक्षणे दिसली तरी कुणी तपासणी करायला जात नाही. एखादा पॉझिटिव्ह आला तरी त्याच्या सानिध्यातील लोकांची तपासणी केली जात नाही.

- ग्रामीण भागात कन्टेनमेंट झोन असले तरी त्या कन्टेनमेंट झोनमध्येही लोक सर्रासपणे फिरत आहेत. त्यांच्यावर आळा घालण्याची गरज आहे.

......

कोट

ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण निघाले तर त्या गावाला कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करून त्या गावातील लोकांना बाहेर पडण्यास मनाई असते आणि बाहेरच्यांना त्या गावात जाण्याची मनाई असते. कोरोना रूग्णांच्या सानिध्यात आलेल्या सर्वांची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते.

- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.

Web Title: Corona Susat in rural areas; No contact tracing or isolation! (Dummy)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.