सौंदड येथे सुरू होणार कोरोना चाचणी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:30 AM2021-04-20T04:30:48+5:302021-04-20T04:30:48+5:30
सडक अर्जुनी : तालुक्यातील सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी तसेच आवश्यक सोयी-सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ...
सडक अर्जुनी : तालुक्यातील सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी तसेच आवश्यक सोयी-सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी सोमवारी सौंदड येथे भेट देऊन हर्ष मोदी व पदाधिकाऱ्यांना दिले.
मागील काही दिवसांपासून सौंदड येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र, यानंतरही ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा नव्हती. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेत भाजयुमोचे जिल्हा महामंत्री हर्ष मोदी आरोग्यविषयक विविध समस्यांबाबत आरोग्य विभागाला निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन मेश्राम सोमवारी सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. सौंदड येथे कोविड केअर सेंटर सुरू करणे, गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची नियमित ऑक्सिजन लेव्हल व तापाची तपासणी करण्यात येणार आहे, रुग्णवाहिकेची व्यवस्था तसेच कोरोनाबाधित रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात औषध उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी दिले. यावेळी संदीप मोदी, हितेश मेश्राम, भूमेश शिवणकर व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.