रोहयो कामावरील मजुरांची कोरोना चाचणी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:30 AM2021-05-27T04:30:55+5:302021-05-27T04:30:55+5:30
बोंडगावदेवी : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, ग्रामस्थांचे आरोग्य सुदृढ राहावे, कोरोना महामारीची भीती ग्रामस्थांच्या मनातून काढण्यासाठी चान्ना ...
बोंडगावदेवी : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, ग्रामस्थांचे आरोग्य सुदृढ राहावे, कोरोना महामारीची भीती ग्रामस्थांच्या मनातून काढण्यासाठी चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम सिलेझरी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामावरील मजुरांची कोरोना चाचणी करण्यात आली तसेच औषधांचेसुद्धा वाटप करण्यात आले. या उपक्रमाला गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
सिलेझरी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वनविभागामार्फत काम सुरू आहे. कामावर असलेल्या मजुरांची आरटीपीसीआर तसेच रॅपिड अँटिजन टेस्ट माध्यमातून कोरोना चाचणी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. कुलकर्णी यांनी, कोरोना संसर्ग होऊ नये व त्याचा गावात शिरकाव होऊ नये म्हणून प्रत्येक जबाबदार नागरिकांनी स्वत: सुरक्षित राहिले तरच अख्ख्ये गाव सुरक्षित राहाणार. सर्वांनी खबरदारी घ्यावी व कोरोनापासून अलिप्त राहण्यासाठी मार्गदर्शक नियम व तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रकृतीमध्ये अस्वस्थता वाटल्यास कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. वेळीच योग्य औषधोपचार झाल्यास कोरोनाला आपण निश्चित हरवू शकतो. आपल्यातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे अनिवार्य असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत, सरपंच सुनीता ब्राह्मणकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी खोब्रागडे, सामुदायिक अधिकारी कान्हे, ग्रामसेवक पटले, आरोग्यसेवक राऊत, सपाटे इत्यादी उपस्थित होते.