जिल्ह्यात कोरोना ‘अंडर-५०’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:37+5:302021-06-24T04:20:37+5:30
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असून जिल्ह्यातून कोरोनाचा काढता पाय दिसत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात ...
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असून जिल्ह्यातून कोरोनाचा काढता पाय दिसत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात बुधवारी (दि.२३) एकूण क्रियाशील रुग्णसंख्या ४६ एवढी नोंदली गेली आहे. शिवाय यातील अर्धे बाधित घरीच अलगीकरणात आहेत. यामुळे आता जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल दिसून येत आहे. मात्र यासाठी नागरिकांनी उपाययोजनांचे पालन करण्याची गरज आहे.
एप्रिल व मे महिना अवघ्या देशासाठीच काळोखाचा ठरला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यावासीयांना झपाट्याने आपल्या तावडीत घेतले व बघता-बघता बाधितांच्या संख्या ४० हजार पार झाली होती. यात शेकडो नागरिकांना जीवही दुसऱ्या लाटेने घेतला. परिणामी जिल्ह्यातील मृतांची संख्या ६९९ वर पोहचली. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून हळूहळू जिल्ह्यातील क्रियाशील रुग्णांची संख्याही कमी होत चाचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात बुधवारी (दि.२३) एकूण क्रियाशील रुग्ण ४६ नोंदले गेले आहेत. यातील २७ बाधित घरीच अलगीकरणात आहेत. म्हणजेच, जिल्ह्यात कोरोना ‘अंडर-५०’ वर आला आहे. तालुक्यातील क्रियाशील रुग्ण संख्या १० च्या आता आली आहे. यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात फक्त १ क्रियाशील रुग्ण उरला असून सर्वाधिक १० रूग्ण सालेकसा तालुक्यात आहेत. जिल्हावासीयांच्या सहकार्यामुळे हे सर्व काही शक्य झाले असतानाच आता यापुढेही कोरोनाला जिल्ह्यात शिरकाव करू द्यायचा नसल्यास नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
-----------------------------------
गोंदिया व तिरोडा नियंत्रणात
जिल्ह्यात कोरोना शिरला तेव्हापासूनच गोंदिया व तिरोडा हे दोन तालुके कोरोना हॉटस्पॉट ठरले होते. आतापर्यंतची सर्वाधिक बाधित व मृत्यूंची संख्याही याच तालुक्यात जास्त आहे. त्यातही गोंदिया शहर व तालुका अत्यंत गंभीर स्थितीत आला होता. मात्र सुदैवाने आता गोंदिया व तिरोडा तालुका नियंत्रणात आले असून गोंदिया तालुक्यात ६ तर तिरोडा तालुक्यात ७ क्रियाशील रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे.
-----------------------
लस व नियमांचे पालन गरजेचे
कोरोनाशी लढण्यासाठी आता लस हाती आल्यानंतरही अधिकाधिक प्रमाणात लसीकरण न झाल्यामुळे कोरोनाने दुसऱ्या लाटेत कहर केला. मात्र आता पुढे कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण व नियमांचे पालन या गोष्टींचीच गरज आहे. यामुळे नागरिकांनी पुढाकार घेत लसीकरण करवून घेण्याची तसेच नियमांचे पालन करूनच वागण्याची गरज आहे, असे झाल्यास कोरोना कायम नष्ट होणार यात शंका नाही.
---------------------------------------
क्रियाशील रुग्णांचा तालुकानिहाय तक्ता
तालुका क्रियाशील रुग्ण
गोंदिया ६
तिरोडा ७
गोरेगाव ८
आमगाव ५
सालेकसा १०
देवरी २
सडक-अर्जुनी ५
अर्जुनी-मोरगाव १
इतर राज्य-जिल्हा २
एकूण ४६