कोरोनाबाधित रुग्णाने घेतली तिसऱ्या माळ्यावरून उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:37 AM2021-04-30T04:37:42+5:302021-04-30T04:37:42+5:30
गोंदिया : शहरातील रिंग रोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने खासगी रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या ...
गोंदिया : शहरातील रिंग रोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने खासगी रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. २९) दुपारी २ ते २.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात तो गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पंडित अर्जुन जाधव (वय ४२, रा. परसवाडा, जिल्हा बालाघाट असे इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार बालाघाट जिल्ह्यातील परसवाडा येथील पंडित जाधव यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने गोंदिया येथील सहयोग हॉस्पिटलमध्ये ८ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होेते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होता. दरम्यान, गुरुवारी दुपारी २ ते २.१५ वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला असूृन, याच रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला यामागील कारण कळू शकले नाही. मात्र, रुग्णालयाच्या आवारातच घडलेल्या या प्रकाराने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद घोंगे यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, रुग्णालय परिसरात सुरक्षा कर्मचारी तैनात असताना अशी घटना घडल्याने रुग्णालयाच्या व्यवस्थापनावरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.