कोरोनावर मात करणारे आणि बाधित सेम सेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:20 AM2021-07-04T04:20:22+5:302021-07-04T04:20:22+5:30
गोंदिया : मागील दोन-तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडी वाढ होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी (दि.३) जिल्ह्यात ८ बाधितांनी कोरोनावर ...
गोंदिया : मागील दोन-तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडी वाढ होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी (दि.३) जिल्ह्यात ८ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या सेम सेम होती.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी २०७७ स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात १३२५ स्वॅब नमुन्यांची आरटीपीसीआर तर ७५२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ८ नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३८ टक्के आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आहे. जून महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येला ब्रेक लागला. त्यामुळे सद्य:स्थितीत कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४७ वर आली आहे. कोरोनाच्या डेल्टा व डेल्टा प्लसच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे खबरदारीच्या उपाययाेजना केल्या जात आहेत. डेल्टाच्या एकाही रुग्णाची नोंद आतापर्यंत झाली नसली तरी जिल्हावासीयांना काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १९८४४२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी १७३३१९ नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत २१८४५४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १९७४६२ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४११५२ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०४०५ जणांनी मात केली आहे. तर ४७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
............
कोरोना रिकव्हरी दर ९८.१८ टक्के
कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट असल्याने जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर ९८.१८ टक्के असून तो राज्याच्या रिकव्हरी दरापेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहे. मागील आठवडाभरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसून ही जिल्हावासीयांसाठी थोडी दिलासादायक बाब आहे.