जिल्ह्यात पुन्हा सुरु झाला कोरोनाचा तीनचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:30 AM2021-04-01T04:30:04+5:302021-04-01T04:30:04+5:30
गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत असल्याचे चित्र ...
गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. तीन आकड्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात पुन्हा तीनचा पाढा सुरु झाला असून जिल्हावासीयांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा हे नागरिकांनाच महागात पडू शकते.
जिल्ह्यात बुधवारी (दि. ३१) ११६ बाधितांची नोंद झाली तर ९२ बाधितांनी कोरोनावर मात केली. मागील महिनाभरातील हा सर्वाधिक आकडा होय. मार्च महिन्यात सातत्याने बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत सुध्दा भर पडली आहे. त्यामुळे प्रशासनाने सुध्दा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहे. टेस्टींग, ट्रेसिंगवर भर देण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने आतापर्यंत १०२४९४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८९५६८ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केल्या जात आहे. यातंर्गत ८८१५९ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८१३८७ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६०६० कोरोना बाधित आढळले असून यापैकी १५०२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ८४१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून २४६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
........
कोरोना नियमांचे करा पालन
नागरिकांनो कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करा, मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, स्वस्त:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या.
............
४५ वर्षावरील नागरिकांना आजपासून लसीकरण
केंद्र शासनाने १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीकरणास सुरुवात केली जाण्याची घोषणा केली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील १०६ केंद्रावरुन कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. नागरिकांना जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात जावून लसीकरण करुन घ्यावे असे आरोग्य विभागाने कळविले आहे.