ककोडी आश्रमशाळेत कोरोनाची एंट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 05:00 AM2021-03-22T05:00:00+5:302021-03-22T05:00:20+5:30
ककोडी येथून सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपासून छत्तीसगडमधून १० ते १२ ट्राॅव्हल्स रायपूर, चंद्रपूर, गोंदिया, वडसा, देवरी, राजनांदगाव येथील प्रवासी फेऱ्या मारतात. या गाड्या नागरिकांच्या सोयीच्या असल्या तरी बस चालक, वाहक मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता सर्रास सर्व नियम धाब्यावर बसवीत आहेत. ककोडी बस स्टँड व गावातून या बसेसचा प्रवास असतो. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा आरोप केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ककोडी : देवरी तालुुक्यातील ककोडी आश्रमशाळेतील १४ विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याची बाब रविवारी (दि. २१) त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर झाली आहे. यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निमार्ण झाले आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून आश्रमशाळेचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.
शासकीय आश्रमशाळा ककोडी येथे १४ विद्यार्थी, वडेकसा १, मुरमाडी ७, तुमळीकसा १ या गावांत असे एकूण २२ कोरोनाबाधित रुग्ण एकाच दिवशी सापडल्याने गावकऱ्यांमध्ये सुद्धा खळबळ उडाली आहे.
ककोडीला लागून असलेल्या राजनांदगाव (छत्तीसगड) जिल्ह्यात १३ दिवसांत २४३ कोरोना रुग्ण सापडल्याची माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्याची सीमासुद्धा या गावाला लागून आहे.
परिणामी या जिल्ह्यातील या भागात नेहमीच ये-जा सुरू असते, तर परिसरातील नागरिक कामानिमित्त छत्तीसगडमधल्या गावात ये-जा करतात.
मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारात छत्तीसगड व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे दुकानदार ककोडीला येतात. मात्र, त्यांच्याकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात नसल्याने परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे बोलले जाते.
छत्तीसगडमधून येणाऱ्या बसेसमुळे संसर्गात वाढ
ककोडी येथून सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपासून छत्तीसगडमधून १० ते १२ ट्राॅव्हल्स रायपूर, चंद्रपूर, गोंदिया, वडसा, देवरी, राजनांदगाव येथील प्रवासी फेऱ्या मारतात. या गाड्या नागरिकांच्या सोयीच्या असल्या तरी बस चालक, वाहक मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता सर्रास सर्व नियम धाब्यावर बसवीत आहेत. ककोडी बस स्टँड व गावातून या बसेसचा प्रवास असतो. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा आरोप केला जात आहे.
काेरोना नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष
ककोडी येथे जिल्हा परिषद हायस्कुल, शाळा, कॉलेज, अंगणवाडी केंद्र आहे. तेथून विद्यार्थी, नागरिकांची वर्दळ सुरू असते. ककोडी गावात व शेजारच्या गावांत लग्न समारंभ, आठवडी बाजारात गर्दी होत असून, कोरोना नियम पाळण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.