कोरोनाची पाऊले वळली आता ग्रामीण भागाच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 05:00 AM2021-03-24T05:00:00+5:302021-03-24T05:00:24+5:30
जिल्ह्यात मंगळवारी (दि. २३) ४८ कोरोना बाधितांची नोंद झाली तर १५ बाधितांनी कोरोनावर मात केली. मंगळवारी आढळलेल्या ४८ बाधितांमध्ये सर्वाधिक २० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २, आमगाव ४, सालेकसा ४, देवरी २, सडक अर्जुनी २, अर्जुनी मोरगाव १२ आणि इतर राज्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. गोंदिया, अर्जुनी मोरगाव, आमगाव आणि तिरोडा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा हळूहळू वाढू लागला असून आता ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाने आपली पावले शहरासह ग्रामीण भागाकडे वळविल्याचे चित्र आहे. मात्र ग्रामीण भागात कोराेनाचा संसर्ग वाढणे जिल्हावासीयांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून कोरोनाला जिल्ह्यात हद्दपार करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात मंगळवारी (दि. २३) ४८ कोरोना बाधितांची नोंद झाली तर १५ बाधितांनी कोरोनावर मात केली. मंगळवारी आढळलेल्या ४८ बाधितांमध्ये सर्वाधिक २० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २, आमगाव ४, सालेकसा ४, देवरी २, सडक अर्जुनी २, अर्जुनी मोरगाव १२ आणि इतर राज्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. गोंदिया, अर्जुनी मोरगाव, आमगाव आणि तिरोडा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या तालुकावासीयांना वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ९६,२६६ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८३,८८१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ८२,२२६ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७५,८०३ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५,१९२ कोरोना बाधित आढळले त्यापैकी १४,४७५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ५३० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ११५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर ९५.६७ टक्के
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच १५ दिवसांच्या कालावधीत कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३० वर पोहोचली आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९५.६७ टक्के असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. तर मृत्यू दर १.२० टक्के आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे होतेय दुर्लक्ष
कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे.