तीन तालुक्यांत वाढतोय कोरोनाचा ग्राफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:27 AM2021-03-25T04:27:45+5:302021-03-25T04:27:45+5:30
गोंदिया : आमगाव, गोंदिया, तिरोडा या तीन तालुक्यांत मागील चार-पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या ...
गोंदिया : आमगाव, गोंदिया, तिरोडा या तीन तालुक्यांत मागील चार-पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाचा ग्राफ वाढत असल्याने या तालुक्यातील नागरिकांना सावध होण्याची गरज आहे.
जिल्ह्यात बुधवारी (दि. २४ मार्च) ५० बाधितांची नोंद झाली तर ४१ बाधितांनी कोरोनावर मात केली. बुधवारी आढळलेल्या ५० बाधितांमध्ये सर्वाधिक २१ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १२, गोरेगाव १, आमगाव ८, देवरी २, सडक अर्जुनी २ तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे. शहरी भागासह आता ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संसर्ग नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ९७,३८८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८४,५५६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत ८३,३५४ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७६,९२१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५,२४२ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १४,५१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ५३९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ५३१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयाेगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
............
१ लाख ८१ हजार चाचण्या
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ८१ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात १५,२४२ कोरोनाबाधित आढळले असून, कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर ८.९ टक्के आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, दररोज २२०० चाचण्या केल्या जात आहेत.
.........
६२ हजार नागरिकांना कोरोनाची लस
कोरोना लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत एकूण ६१ हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत ५१ केंद्रांवरून लसीकरण केले जात असून, दररोज जवळपास ३,५०० नागरिकांना लसीकरण केले जात आहे.